नवनीत राणा व रवी राणा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यावर बंटी-बबलीच्या स्टंटबाजीमुळे शिवसेनेला काही फरक पडत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, धर्मावरून नवनीत राणा व रवी राणा यांची सध्या केवळ नौटंकी सुरू आहे. ते दोघेही भाजपचे सी ग्रेड अॅक्टर्स आहेत. मात्र, अशा राजकारणाला लोक गांभीर्याने घेत नाहीत.
मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहेत. त्यावरून मुंबईत वातावरण चांगलेच तापले आहे. मातोश्रीबाहेर तसेच मुंबईत ठिकठिकाणी शिवसैनिकांतर्फे राणा दाम्पत्याचा निषेध केला जात आहे. यावर संजय राऊत म्हणाले, राणा दाम्पत्याला मुंबईचे पाणी माहित नाही. त्यांनी कितीही नौटंकी केली तरी त्यामुळे शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. तसेच, हि स्थिती हाताळण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम आहेत, असेही ते म्हणाले.
राम जयंती साजरी करणे व हनुमान चालिसा म्हण्णे हे धार्मिक आणि श्रद्धेचे विषय आहेत. मात्र भाजपकडून सी ग्रेड अॅक्टर्सच्या मदतीने यावर केवळ नौटंकी सुरू आहे. हिंदुत्वाच्या नावावर भाजपकडून सध्या देशभरात जे वातावरण तापवले जात आहे. त्यातील हे दोघे पात्र आहेत. अशा पात्रांना लोक गांभीर्याने घेत नाही, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, या दोघांचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून शिवसेना गुढीपाडवा, हनुमान जयंती, राम जयंती धुमधडाक्यात साजरी करत आहे. त्यामुळे हिंदुत्व काय आहे, हे आम्हाला शिकवू नका, असेही त्यांनी सुनावले.