Home हिंदी Covid-19 : आता नागपुरात मास्क न वापरणाऱ्यांवर 500 रुपये दंड

Covid-19 : आता नागपुरात मास्क न वापरणाऱ्यांवर 500 रुपये दंड

744

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आढावा बैठक

नागपूर : नागपुरात वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत. सार्वजनिक स्थळी मास्क वापरणे बंधनकारक असतांना सुद्धा अनेक नागरिक मास्क न वापरता सर्रास बाहेर निघत आहेत. आत्ता पर्यंत मास्क न वापरणाऱ्या वर दोनशे रुपये दंड आकारण्यात येत होता. तो आता वाढवून पाचशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी रविवारी कोरोना उपाय योजनांच्या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर शहर व ग्रामीण भागात कोविड -19 च्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेन्याय आला.


हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचा विचार करुन टाळला लॉकडाउन

यावेळी प्रशासनाची लॉकडाऊन संदर्भातील मते देखील त्यांनी जाणून घेतली. तथापि, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या समस्यांना लक्षात घेता, तूर्तास हा निर्णय घेणे योग्य नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. तथापि, यापुढे कोरोना सोबत लढताना व जगताना प्रत्येक नागरिकाला स्वयंशिस्तीने वागणे गरजेचे आहे. गरज नसताना बाहेर पडणे हे धोक्याचे असून मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, तपासणी स्वयंप्रेरणेने करून घेणे या बाबींसाठी जनजागृती वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


या बैठकीला ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले होते. नागपूर व विदर्भातील अन्य जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची पूर्तता सुलभ पद्धतीने होण्यातील अडचणी जाणून घेतल्या. आवश्यकतेनुसार अन्य जिल्ह्यांना थेट ऑक्सिजन मिळेल, अशा पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तथापि, नागपूरमधल्या शासकीय व खाजगी दोन्हीही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही, याची जबाबदारी देण्यात आली.

मनुष्यबळाच्या कमतरतेला लक्षात घेता नागपूर व परिसरातील शासकीय-निमशासकीय सर्व कॉलेजमधील शेवटच्या वर्षातील व शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेल्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना रुग्ण सेवेमध्ये रूजू करून घ्यावे. तसेच आशा व अंगणवाडी सेविकांसोबतच परिचारिकांना देखील आवश्यक मानधन वाढवून देण्यावर त्यांनी भर दिला.

या बैठकीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, कोविड 19 च्या नोडल अधिकारी तथा वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे, मिताली सेठी, मनीषा खत्री, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त आयुक्त राम जेाशी, उपायुक्त मिलिंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार यांच्यासह वैद्यकीय तज्ज्ञ व कोविड19 नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीचे मुख्य मुद्दे –

  1. कोरोना नियंत्रणासाठी प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित
  2. तूर्तास लॉकडाउन नाही; स्वयंशिस्त वाढवण्याचे आवाहन
  3. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  4. बेड मॅनेजमेंटसाठी आयएएस अधिकाऱ्यांनी आणखी सक्रिय व्हावे
  5. ट्रेसिंग वाढवा; मृत्यूदर कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
  6. मेयो व मेडिकलमध्ये वॉर रूम सुरू करण्याचे निर्देश
  7. ऑक्सीजन पुरवठ्यातील सुलभता व उपलब्धतेवर चर्चा
  8. गर्दी नियंत्रण, गृह अलगीकरणासाठी व्यापक मोहीम राबवा
  9. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची सेवा घ्या