– इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचा दीक्षांत समारोह संपन्न
– विविध पुरस्कार व 424 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
नागपूर ब्युरो : वेगाने आपण ‘डिजिटल’ जगाकडे झेपावत असून हेच आपले भविष्य राहणार आहे. नवनवीन संधी घेऊन येणा-या या ‘डिजिटल’ जगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार रहा, असे आवाहन लार्सन अँड टुब्रोचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांना केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या 4 थ्या, 5 व्या आणि 6 व्या बॅचेसचा दीक्षांत समारोह रविवारी इन्टिट्यूटच्या मिहान येथील परिसरात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लार्सन अँड टुब्रोचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम होते तर आयआयएम नागपूर बोर्ड ऑफ गव्हर्नरचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी व आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना विविध सुवर्णपदकांसह पदवींचे वितरण करण्यात आले.
एस. एन. सुब्रमण्यम म्हणाले, कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्धासारखी अनेक संकटे जगासमोर एकामागोमाग एक आली आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली असून मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. असे असले तरी आऊटसोर्सिंग, स्टार्टअप सारख्या अनेक नवकल्पना जन्माला आल्या असून त्यामुळे चांगल्या संधी आणि नवप्रतिभाही पुढे आल्या आहेत.
आपले ध्येय निश्चित करा, ते साध्य करण्यासाठी कोणताही शॉर्टकट न वापरता कठोर मेहनत करा. यश-अपयश हा जीवनाचा अविभाज्य भाग असून अपयश आल्यास आत्मचिंतन करा, चुका सुधारा वाचनाची सवय लावा, असे विद्यार्थ्यांना सांगतानाच सुब्रमण्यम यांनी, शिकण्याची प्रक्रिया सुरूच ठेवा, संगीत, वाद्य, खेळ आदी कौशल्य आत्मसात करा, कोणतेही उत्तमच करा, असा सल्ला दिला.
सुरुवातीला सी.पी. गुरनानी यांनी दीक्षांत समारोहाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. सोबतच, त्यांनी निमंत्रित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्ष दीक्षांत समारोह होऊ शकला नाही. त्यामुळे या दोन वर्षांसह यावर्षीचा दीक्षांत सोहळा घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना उद्योग, कार्पोरेट इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी असून जिद्द, मेहनत करण्याची तयारी, तीव्र इच्छा याआधारे तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करता येतील. जिद्द कायम ठेवली तर यश निश्चित मिळेल असे सांगताना त्यांनी एका छोट्या गावातून आलेल्या एस. एन. सुब्रमण्यम यांचे आदर्श उदाहरण तुमच्यासमोर असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री यांनी आयआयएमच्या कार्याचा आढावा घेतला.
पदवी व पुरस्कारांचे मानकरी
दीक्षांत समारोहात एकुण 424 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. सोबतच, बेस्ट स्कोलास्टिक परफॉर्मन्स अवॉर्ड 2018-20 साठी अंकिता जोशी हिला तर 2019-21 साठी इना गुप्ता हिला प्रदान करण्यात आला. बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स अवॉर्ड 2018-20 साठी टी. भरत याला तर 2019-21 साठी शेख फरीद अहमद याला प्रदान करण्यात आला. बेस्ट स्कोलास्टिक अचिव्हमेंट इन्स्टिटयूट अवॉर्ड डिम्पी खुराना हिला तर बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स इन्स्टिट्यूट अवॉर्ड समृद्धी कोळी हिला प्रदान करण्यात आला. कॅनरा बँक पुरस्कृत पुरस्कार सौरभ भार्गवला तसेच, बँक ऑफ बडोदा पुरस्कृत पुरस्कार चिन्मय मिश्रा, वैष्णवी अरकोट व प्रगती लोहानी यांना दीक्षांत समारोहाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात आले.