Home मराठी राज ठाकरेंची सभा । गडबड झाली तर गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा इशारा

राज ठाकरेंची सभा । गडबड झाली तर गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा इशारा

आठ दिवसांपासून महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या राज ठाकरे यांच्या सभेला एक अट आणि एका इशाऱ्यावर परवानगी देण्याच्या हालचाली बुधवारी झाल्या. प्रक्षोभक भाषण नको अशी अट आणि सभेनंतर गडबड झाली तर आयोजक, वक्त्यावर गुन्हा दाखल होईल हा इशारा देणारी नोटीस बजावून २८ एप्रिल रोजी म्हणजे गुरुवारी परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. याचे संकेत मिळू लागताच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर १ मे रोजीच ही सभा होईल, असा दावा मनसेचे नेते, माजी गृह राज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी केला. इतर नेत्यांना परवानगी मिळाली तर आम्हालाच कायद्याचा बडगा का, असाही सवाल त्यांनी केला आहे.

17 एप्रिल रोजी पुण्यात राज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात औरंगाबादला सभा घेण्याचे जाहीर केले. तत्पूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या संचालकांकडून मैदान वापराचे पत्र मिळवले होते. मात्र, यात पोलिसांची परवानगी महत्त्वाची आहे, असे मसांमंच्या संचालकांचे म्हणणे असल्याने त्याच दिवशीही अर्ज प्रक्रिया सुरू झाली. दुसरीकडे सभेला महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीसह अनेक संघटना, पक्षांनी विरोध दर्शवला. पोलिस आयुक्तांना निवेदने दिली. त्यामुळे पोलिस परवानगीचा मुद्दा अधिक चर्चेत आला. “मातोश्री’वरूनही अप्रत्यक्ष दबाव असल्याची चर्चा सुरू झाल्याने लांबतही गेला.

सभेची परवानगी, पूर्वतयारीसाठी मनसे नेते नांदगावकर बुधवारी औरंगाबादेत आले. त्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेतली. ‘आम्हाला आमचे म्हणणे मांडायचे आहे, त्यासाठी सभेला परवानगी मिळावी,’ अशी विनंती नांदगावकर यांनी १५ मिनिटांच्या चर्चेत केली. त्यावर “सर्व बाबींचा विचार करून २८ एप्रिल रोजी कळवतो,’ असे आयुक्तांनी उत्तर दिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शिष्टमंडळात प्रवक्ते प्रकाश महाजन, मराठवाडा नेते दिलीप धोत्रे आणि जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने तसेच पोलिस उपायुक्त उज्ज्वला वनकर यांच्या नेतृत्वातील पथकाने मसांमंच्या मैदानाची पाहणी केली. शहर व जिल्ह्यातून सभेला येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची किती गर्दी होऊ शकते, मंचाची रचना कशी असेल, त्यावर किती जण बसतील, मंचाकडे येण्या-जाण्याचा मार्ग कोणता असेल, वाहनतळ कुठे असेल, याविषयी चर्चा केली. पाहणीनंतर काही तासांतच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आयुक्तांनी जाहीर केले. सभेला परवानगी देण्याचीच ही तयारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, औरंगाबादेत शरद पवार तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत सभा झाल्या. त्यांना परवानगी, मग आम्हाला कायद्याचा बडगा का, असा प्रश्न नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. मी गृह राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे अशा निर्णयात उशीर लागतो, हे मला माहीत आहे. पण एकुणात यावरून राज ठाकरे किती मजबूत आहेत, हे कळते. पोलिस त्यांचे काम करीत आहेत. कायदा-सुव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करीत आहेत आणि आम्हीही त्यांना सहकार्य करीत आहोत. सभा औरंगपुरा येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच होणार आहे. पोलिसांनी गुरुवारी निर्णय दिल्यावर पुढची तयारी सुरू होईल.