Home Nagpur #Nagpur | सर्वसामान्य जनतेस सन्मानाची वागणूक द्या : अजित पवार

#Nagpur | सर्वसामान्य जनतेस सन्मानाची वागणूक द्या : अजित पवार

पोलीस भवन इमारतीचे लोकार्पण, राज्यातील सुसज्ज व उत्कृष्ट पोलीस भवन, अमृत महोत्सवी वर्षात 87 पोलीस स्टेशन बांधणार

नागपूर ब्यूरो: कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी.असे बजावतानाच पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

नागपूर येथील सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलीस भवन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील होते.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

यावेळी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस गृहनिर्माण कल्याण मंडळाचे महासंचालक विवेक फणसळकर, अपर पोलीस महासंचालक श्रीमती अर्चना त्यागी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उप महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजय मगर आदी उपस्थित होते.

नागपूर येथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची उत्तम जबाबदारी सांभाळत असताना विभागाने निष्पक्ष काम करताना कुणाच्याही दबावाला बळी न पडण्याची सूचना करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पोलीस भवन ही वास्तू नागपूरच्या वैभवात भर घालणारी आहे. सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट सेवा मिळेल या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील पोलीस विभागाची परंपरा व नावलौकिक संपूर्ण देशभर आहे आणि ते वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नागपूर येथे नुकत्याच झालेल्या सराफा व्यापाऱ्याचा चोरीसंदर्भात पोलिसांनी सत्तावीस तासांत तपास करुन सहा कोटी रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याबद्दल नागपूर पोलिसांचे अभिनंदन करताना सर्व सराफा व्यापाऱ्यांनी कामावर असलेल्या कामगारांची संपूर्ण माहिती ठेवावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या 87 पोलिस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम करण्यात येणार असून राज्यातील सर्व जिल्हा नियोजन मंडळाने पोलीस विभागासाठी वाहने व इतर आवश्यक सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. अशा सूचना पालकमंत्र्यांना दिल्या.

नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी तसेच पुण्याच्या धर्तीवर सर्व सुविधा असलेल्या शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस विभागाची असून नागपूर शहरातील गुन्हेगारी कमी करण्यास पोलिसांना यश आल्याचे सांगताना गृहमंत्री श्री. वळसे-पाटील म्हणाले की, गुन्हेगारीचे स्वरुप बदलत असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. अमली पदार्थांचा वाढता व्यापार हा चिंतेचा विषय असून त्यावर कठोर निर्बंध घालून संपवायचा आहे. यासंदर्भात कुणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासंदर्भात बोलताना गृहमंत्री म्हणाले की, 5 हजार 200 पोलिसांची भरतीपक्रिया पूर्ण होत असून दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील जुन्या व मोडकळीस आलेल्या पोलीस स्टेशनच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. पोलिसांना गृहनिर्माणासाठी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल. समाजातील विविध घटकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पोलीस भवन या सुसज्ज इमारतीमध्ये सर्व सेवा एकत्र मिळणार असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोलीस विभागाचे पाच ऐवजी सात झोन करणे आवश्यक आहे. पाचपावली, कोतवाली आदी पोलीस स्टेशनच्या इमारतींच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच मनुष्यबळ सुद्धा वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत तसेच पुण्याच्या धर्तीवर सुसज्ज विश्राम गृहाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी नागपूर या उपराजधानीच्या शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागांचे योग्य नियोजन आहे. मोटर व्हे‍ईकल ॲक्टमध्ये पोलीस व परिवहन विभागातर्फे वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करण्यात येते. त्यामध्ये एकसूत्रता यावी, अशी सूचना यावेळी त्यांनी दिली.

प्रारंभी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात पोलीस भवनाच्या नवीन इमारतीसंदर्भात माहिती दिली. सात मजली सुसज्ज इमारतीमध्ये नागपूर शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय राहणार आहे. या इमारतीमध्ये पोलीस विभागाच्यासंबंधी सुविधा उपलब्ध असून वीस हजार चौरस फूट जागेवरील इमारतीसाठी 97 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शहरात नुकत्याच झालेल्या सराफा व्यापाऱ्याच्या दुकानातील सहा कोटी रुपयांच्या चोरीसंदर्भात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मुद्देमाल उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संबंधित सराफा व्यापाऱ्याला सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार पोलीस उपायुक्त डॉ.संदीप पखाले यांनी केले.