Home मराठी मनसेची 3 मेची महाआरती रद्द, ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर तणाव येऊ नये म्हणून...

मनसेची 3 मेची महाआरती रद्द, ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर तणाव येऊ नये म्हणून 4 मे रोजी आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 3 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्यभरात महाआरतीचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर तणाव येऊ नये म्हणून आता 3 मेऐवजी 4 मे रोजी राज्यभरात महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र तथा मनसे नेते अमित ठाकरे दादर मधील प्रभादेवी मंदिरात महाआरती करतील. तसेच राज्यभर विभागानुसार महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबाद मधील सभा चांगलीच वादळी ठरली. अपेक्षेप्रमाणे राज यांनी पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले. 4 मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवतील असा अल्टीमेटम राज ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई ठाणे आणि नंतर औरंगाबाद मध्ये सभा घेत आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज ठाकरे असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

महाविकासआघाडी मधील सर्वच नेते मंडळी राज यांच्या भाषणावर टीका करत आहे. राज ठाकरे यांनी देखील शरद पवार यांच्यावर निशाणा साधत शरद पवार यांना ‘हिंदुत्त्व’ या शब्दाचीच अ‍ॅलर्जी असल्याचे म्हटले होते. आता राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला घेरणार असल्याचं दिसून येतंय. मनसेच्या वतीने राज्यभर विभागवार महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.