Home मराठी कर्जदारांना झटका । गृह, वाहन कर्ज महागणार, ईएमआय मध्ये मोठी वाढ

कर्जदारांना झटका । गृह, वाहन कर्ज महागणार, ईएमआय मध्ये मोठी वाढ

देशातील महागाई दर सातत्याने वाढत आहे. या महागाईचा फटका आता देशातील कर्जदारांना देखील बसला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता रेपो दर 4% वरुन वाढवून 4.40% करण्यात आला आहे. म्हणजेच तुमचा ईएमआय आणि कर्ज महागणार आहे.

2 आणि 3 मे रोजी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तातडीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पतधोरण आढावा बैठक दर दोन महिन्यांनी घेतली जाते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक गेल्या महिन्यात ६-८ एप्रिल रोजी झाली होती. पुढील बैठक जूनमध्ये होणार होती.

पतधोरण आढावा बैठक वास्तविक दर दोन महिन्यांनी होते. या आधी ६ ते ८ एप्रिल रोजी बैठक झाली होती. तर या आधी 22 मे 2020 रोजी रेपो दरात बदल करण्यात आला होता. तेव्हापासून रेपो दर 4% या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आहेत. मात्र, आता रेपो दरात वाढ करण्यात आली आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलापासून धातूच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असताना आरबीआयच्या पत धोरण समितीची (एमपीसी) तातडीची बैठक झाली. अशा स्थितीत जगभर महागाई ही मोठी समस्या बनली आहे. मागील बैठकीत, RBI ने पहिल्या तिमाहीत महागाई दर 6.3%, दुसऱ्या तिमाहीत 5%, तिसऱ्या तिमाहीत 5.4% आणि चौथ्या तिमाहीत 5.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.