सध्या देशभर उन्हाळ्याच्या झळांनी आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना एक दिलासादायक बातमी आहे. मोसमी पाऊस अर्थात मान्सून यंदा १० दिवस आधीच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर पॉडकास्टने हा अंदाज वर्तवला आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वातावरण बदलांमुळे मोसमी पावसाचे ढग लवकर दाखल होत असल्याने मे महिन्यात लवकरच उकाड्यापासून मुक्तता होऊ शकेल. या अंदाजानुसार २० व २१ मे रोजी अंदमानात मान्सूनचे आगमन होईल. २८ ते ३० मेपर्यंत तो केरळमध्ये मुक्कामी येईल.
औरंगाबाद- यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन चार ते आठ दिवस अगोदर होण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबारला २० मे ऐवजी १७ ते १८ मे, केरळ १ जून ऐवजी २७ ते २८ मे आणि मराठवाड्यात १५ जूनऐवजी ७ ते १० जून दरम्यान मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.
यंदा उन्हाळा चांगलाच तापला. वाळवंटी प्रदेशातील उष्ण वाऱ्यांमुळे मार्च, एप्रिल आणि मेमध्येही ४० ते ४५ अंश उच्चांकी तापमान राहिले. अरबी समुद्रावर सध्या तरी चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून १२ मेपर्यंत तो राैद्ररूप धारण करेल. मान्सूनसाठी ते अनुकूल ठरेल. अंदमान- निकोबार बेटांवर १७ किंवा १८ मे रोजी मान्सूनचे आगमन होईल. उत्तर, राजस्थानमधील ९९८ हेप्टापास्कल कमी हवेचा दाब अंदमान ते कोकणमार्गे महाराष्ट्र व पुढे मान्सूनचे आगमन वेगाने करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला.
चंद्रपूर ४५.२, वर्धा ४४.४, ब्रह्मपुरी ४४, जळगाव ४३.८, अमरावती ४३.८, अकोला ४३.७, नागपूर ४३.७, नaांदेड ४३.२, परभणी ४२.८, सोलापूर ४२.६, गडचिरोली ४२.६, गोंदिया ४१.२, औरंगाबाद ४०.९, सांगली ४०.२, सातारा ३९.४, पुणे ३९.३, कोल्हापूर ३८.६, नाशिक ३७.५.
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा वाढलेला राहिला. शुक्रवारी चंद्रपूर ४५ अंश तर वर्धा, ब्रह्मपुरी, जळगाव, अमरावती, अकोला, नागपूर, नांदेड, परभणी, सोलापूर, गडचिरोली, गोंदिया, औरंगाबाद, सांगली या ठिकाणी पारा ४० अंश सेल्सियसवर होता.