Home मराठी नागपूर, मुंबई, बोरिवली, नाशिकसाठी एसटीची स्लीपर कोच बससेवा सुरू; चांगला प्रतिसाद

नागपूर, मुंबई, बोरिवली, नाशिकसाठी एसटीची स्लीपर कोच बससेवा सुरू; चांगला प्रतिसाद

तब्बल पाच महिन्यांनंतर नागपूर, मुंबई, बोरिवली, नाशिकसाठी स्लीपर कोच बससेवा सुरू झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर लालपरी, एशियाड, व्होल्व्हो, पुशबॅक, अश्वमेध, स्टील बॉडीच्या विठ्ठाई, वातानुकूलित शिवशाही आणि नॉन एसी स्लीपर कोच बस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सबरोबर स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांच्या मागणीनुसार स्लीपर बसही सुरू केल्या आहेत.

त्यानुसार औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून नागपूर व नाशिक आणि पैठण बसस्थानकातून मुंबईसाठी दोन, बोरिवलीसाठी स्लीपर कोच बससेवा सुरू केली आहे. लांब पल्ल्यासाठी बसून जाणे प्रवाशांना जिकिरीचे वाटते. त्यामुळे स्लीपर कोचला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस लवकरच राज्यभर धावण्यास सुरुवात होणार आहे. १ जून रोजी पुणे ते अहमदनगर ही पहिली ई-बस धावेल. औरंगाबाद एसटी विभागासाठी पहिल्या टप्प्यात ७० बसेसच्या मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ई-बस दखल होतील.

सध्या शहरातील वाहनांची संख्या १५.८७ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. दिवसागणिक सुमारे दोनशे नवीन वाहनांची भर पडत आहे. प्रदूषित शहर म्हणून औरंगाबादचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. वाहनांमुळे होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्यासाठी कार्बन उत्सर्जन, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे, पारंपरिक पेट्रोल-डिझेल इंधनाला सक्षम पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी केंद्र सरकारने ई-वाहन धोरण व सेवा सवलती लागू केल्या आहेत. शहर व जिल्ह्यातील सध्या दुचाकी- १७८५, तीनचाकी- १५५, आणि चारचाकी- २१० ई-वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे झालेली आहे.