नागपूर येथील संघाच्या मुख्यालयाची रेकी करणाऱ्या एका संशयित दहशतवाद्याला एटीएसच्या पथकाने जम्मू-काश्मीरमधून अटक केली आहे. रईस अहमद असदुल्ला शेख असे आरोपीचे नाव आहे. रईस जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी आरोपीला जानेवारीत दुसर्या प्रकरणात अटक केली होती. रईस अहमदला नागपूर एटीएसने प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले असून लवकरच त्याला नागपुरात आणले जाईल. रईसने गेल्या वर्षी जुलै महिन्यात नागपुरात येऊन हेगडेवार स्मृती भवन परिसर व इतर महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी संघ मुख्यालयाचा बंदोबस्त कडेकोट केला होता. हेडगेवार स्मारक इमारत परिसरात ड्रोनलाही बंदी घालण्यात आली होती.
घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू झाला आणि रईस अहमद शेख याचा शोध सुरू होता. अखेर त्याला जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रईसने कबूल केले की, पाकिस्तानमधील जैशच्या सूत्रधाराच्या सांगण्यावरून त्याने आरएसएसच्या मुख्यालयात रेका केली होती. त्याला ताब्यात घेतल्यानंतर नागपूर एटीएसच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रईसची जम्मू-काश्मीरमध्ये चौकशीही केली आहे. एटीएसने रईसला पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय नेहमीच अतिरेक्यांचे लक्ष्य राहिले आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रईसच्या चौकशीतून आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याआधी ऑक्टोबर 2020 मध्ये RSS नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचल्याची चर्चा होती. त्यावेळी दहशतवादी हा हल्ला करण्यासाठी आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) किंवा स्फोटकांनी भरलेले वाहन (व्हीआयईडी) वापरू शकतात, असे सांगण्यात आले. त्यादरम्यान, इंटेलिजन्स ब्युरो (IB) दिल्लीनुसार, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान आणि ईशान्येकडील राज्यांतील नेत्यांना लक्ष्य करण्यात आले होते.