छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सर्वांच्या समस्या ऐकून घेत होते. अचानक एक डीआरजी जवानाने हात उंचावला असता मुख्यमंत्री म्हणाले, त्यांना माइक द्या… जवान म्हणाला- सर, मी आधी नक्षलवादी होतो, नंतर शरणागती पत्करली. दलात भरती झालो. आता ठाणेदार आहे. तुमच्याशी हात मिळवायची (शेकहँड) इच्छा आहे. बघेल म्हणाले, अरे, इकडे या…आणि गळाभेट घेतली. नंतर खांद्यावर हात ठेवून म्हणाले, माझ्यासोबत यांचा फोटो घ्या. डीजीपींसह सर्व पोलिस अधिकाऱ्यांसमक्ष या जवानाच्या हिमतीचे सर्वांनी कौतुक केले. उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. हा प्रसंग मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या जनता दरबारात घडला. ते सरकार कसे काम करत आहे, हे जाणून घेत आहेत. स्वत:ची समीक्षा करत आहेत. अधिकाऱ्यांना कामचुकारपणावर त्वरित शिक्षाही करत आहेत. उत्तर छत्तीसडमधील सरगुजाहून सुरू झालेला दौरा दुसऱ्या टप्प्यात ते थेट छत्तीसगडमधील कोंट्याला पोहोचले. त्यांचा प्रवास सुरूच आहे. ते थेट लोकांशी संवाद साधत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत डीआरजीचे जवान होते. त्यापैकी अनेक जण पूर्वी नक्षलवादी होते. शरण आल्यानंतर ते डीआरजीत भरती झाले. त्यापैकी एक ३६ वर्षीय मडक्कम मुदराज यांनी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची गळाभेट घेतली. मडक्कम यांनी सांगितले,‘मी पूर्वी जनमिलिशियाचा सदस्य होतो. शरणागतीनंतर कॉन्स्टेबल, हवालदार, एसआय आणि आता डीआरजीचा ठाणेदार आहे. पत्नीने माझ्यात बदल घडवून आणला. मला तीन मुले आहेत. मोठे झाल्यानंतर त्यांचीही अधिकारी होण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून आनंद झाला. त्यांनी खांद्यावर हात ठेवला तेव्हा मी खूप मोठा माणूस झालो आहे, असे वाटले.’