यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा चढता राहिला आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. उष्णतेचा प्रकोप वाढल्याने आगीच्या घटनाही वाढल्या आहेत. परभणी, हिंगाेली, उस्मानाबाद वगळता इतर ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशीपार आहे. हवामानतज्ज्ञानुसार, आणखी दोन दिवस उष्णतेचा कडाका ४२ ते ४३ अंशांवर कायम राहण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसानंतरच तापमान हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाकडून सांगण्यात आले.
मराठवाड्यात या वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमान वाढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच तापमानात तफावत जाणवत होती. एप्रिलच्या १५ तारखेपासून अपेक्षित असते ते मार्चमध्ये अनुभवायला आले. महिनाभर आधीच तापमान ४० अंशांपर्यंत गेले. मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत पारा ४२ ते ४३ अंशांवर राहत आहे. कडक उन्हामुळे अनेक जण दुपारी बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. शेतीमधील मशागतीच्या कामांनाही अडथळा निर्माण होत आहे.
जालना- जालना-नांदेड महामार्गावरील चौधरीनगर परिसरातील एका पेट्रोल पंपाशेजारी बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक कडबा aघेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात संपूर्ण ट्रक आणि त्यातील २० हजार रुपयांचा कडबा जळून खाक झाला. ट्रकचालकाने प्रसंगावधान राखल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.