राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, परीक्षा कोणत्या मोडमध्ये घेण्यात येईल, यासंदर्भात अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. यंदाची उन्हाळी परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे संकेत विद्यापीठ प्रशासनाकडून दिले जात आहे.
उन्हाळा संपत येत असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले नव्हते. त्यामुळे गेले काही दिवस विविध विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल्या. परीक्षा ऑनलाइन होईल की ऑफलाईन या संदर्भात ही स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढलेला होता. बुधवारी नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची बैठक पार पडली. त्यात परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा 8 जूनपासून सुरू होतील. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 जूनपासून सुरू होतील या आशयाचे विद्यापीठाने परिपत्रक जाहीर केले आहे. जुलै महिन्यापर्यंत सर्व परीक्षा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विद्यापीठाने निश्चित केले आहे.
एकीकडे राष्ट्रसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे नागपूर विद्यापीठावरही उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासंदर्भात दबाव वाढलेला आहे. त्यामुळेच नागपूर विद्यापीठ प्रशासनाने सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू केले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
नागपूर विद्यापीठाने ऑफलाइन पद्धतीने उन्हाळी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला तर विद्यार्थ्यांना परीक्षा देताना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे.