Home मराठी नाना पटोले । ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेस आक्रमक:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, राज्यव्यापी आंदोलनाचा...

नाना पटोले । ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेस आक्रमक:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. महाराष्ट्रातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, 2017 पासून ओबीसी आरक्षणाला महाराष्ट्रात ग्रहण लागलेले आहे. ते आजही संपलेले नाही. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ओबीसींना आरक्षण मिळावे आणि आता होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाने व्हायला हव्यात. त्या दृष्टीकोनातूनच मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेवर जाण्यासाठी सर्वपक्षीयांना आवाहन केलंय. पण आधी शिवबंधन बांधा मग आम्ही तुमची उमेदवारी घोषित करु, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. सेनेच्या भूमिकेने संभाजीराजेंची अडचण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, उमेदवारी देण्याचा अधिकार सेनेला आहे. सेना ज्या व्यक्तीला उमेदवारी देईल. त्यांना आमचा पाठिंबा राहिल. संभाजीराजेंबद्दल आमचा आदर आहे. शिवसेनेच्या निर्णयाला आमचे समर्थन राहिल.

ओबीसींचा राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आजही तोडगा निघालेला नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकारकडून प्रचंड प्रयत्नही सुरु आहेत. पण राज्य सरकारला त्यामध्ये हवं तसं यश मिळताना दिसत नाहीय. राज्यात दोन महिन्यांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे ओबीसी समाजातील नेते आक्रमक झाले आहेत.