गेल्या 5 वर्षांत दूध, किराणा आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती 40-70 टक्क्यांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट पार कोलमडून गेले आहे. दुसरीकडे, एफएमसीजी कंपन्यांच्या नफ्यात मात्र 70 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दरवाढीमुळे जीएसटी संकलनातही 25 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याने सरकारही फायद्यात आहे.
एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई निर्देशांक 8 वर्षांतील उच्चांकी 7.79%, तर घाऊक महागाई निर्देशांक 9 वर्षांतील उच्चांकी 15.08% वर पोहचल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाची आकडेवारी सांगते. गेल्या 5 वर्षांतील महागाईचे विश्लेषण केले असता दुधापासून किराण्यापर्यंत, विजेपासून पेट्रोलपर्यंत, भाज्यांपासून स्वयंपाकाच्या गॅस आणि औषधांपर्यंत सर्वच वस्तूंच्या किमती दुप्पट किंवा तिप्पट वाढल्याचे समोर आले आहे. महागाईमुळे ग्राहक संकटात, तर कंपन्या व सरकार मात्र भरपूर नफ्यात आहे.
इंधन दरातही प्रचंड वाढ झाली. एप्रिल 2018 च्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये पेट्रोल 45%, डिझेल 43% तर घरगुती गॅस सिलिंडर 89 टक्क्यांनी महागले. तेल कंपनी इंडियन ऑइलने 2018-19 च्या तुलनेत 2021-22 मध्ये 43 टक्क्यांपर्यंत जास्त नफा नोंदवला. 2012 मध्ये राज्यात दूधाची सरासरी किंमत 28 रुपये प्रतिलिटर इतकी होती.
2018 मध्ये ती 42, 2022 मध्ये 48 रुपये झाली आहे.