इंग्रज गेले, आता आपण आपली प्रथा सुरू करू. दीक्षांत सोहळा उत्साहाने भरलेला असायला हवा. तरुणांच्या कलाने कार्यक्रम हवा. तुमचा वेतन आयोग माझ्या दृष्टीने गौण आहे. विद्यार्थी महत्त्वाचा आहे. त्यांना काय हवे याचा विचार होणार की नाही? त्यामुळे दीक्षांतची ही प्रथा बदलायला हवी. ब्रिटिशकालीन दीक्षांत समारंभाची पद्धत बंद करून पुढील वर्षांपासून मराठमोळा पदवी प्रदान दीक्षांत सोहळा होईल, अशी घोषणा माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या सभागृहात शासकीय तंत्रनिकेतन स्वायत्त संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. दीक्षांत सोहळ्याचा वेळ कमी करणे आवश्यक आहे. दीक्षांत समारंभ खूप लांबलचक व कंटाळवाणे होतात, अनेकांना झोपा येतात. विद्यार्थ्यांचे कार्यक्रम त्यांच्यासाठी असायला हवेत. पदवी प्रदान कार्यक्रमात इतकी भयाण शांतता बरी वाटत नाही.
दीक्षांत समारंभांमध्ये विद्यार्थ्यांनी काय करावे याचे मार्गदर्शन करणारे राजकारणविरहित लोक, मंडळी व्यासपीठावर हवी, असेही सामंत म्हणाले. विद्यार्थ्यांनी आता ऑफलाइन परीक्षा पद्धती स्वीकार करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता बदलवून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी प्राचार्य व प्राध्यापकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. असे ते म्हणाले.
काही कुलगुरूंनी निवृत्त झाल्यावर मी विद्यापीठामध्ये हस्तक्षेप करतो, असे आरोप केले. मात्र, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हवा असेल, यांच्या स्वतःच्या वेतनाची किंवा कुलसचिवांची थकबाकी असेल, तर मंत्र्याची मदत हवी. मात्र चांगल्या गोष्टीसाठी आम्ही सूचना दिल्या तर लगेच हस्तक्षेपाचा आरोप होतो, असे म्हणत सामंत यांनी उघडपणे कुलगुरूंसमोरच आपली नाराजी व्यक्त केली. आजपर्यंत कधीतरी शिवसेनेच्या एखाद्या मुलाला प्रवेश द्या किंवा नोकरी द्या म्हणून संपर्क केला असेल तर सांगा, आताच पदाचा राजीनामा देतो, असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या (बाटू) नागपूर येथील उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.