Home मराठी डॉ. भागवत कराड । औरंगाबादसह सातारा, नागपूर, मुंबईत सुरू होणार डिजिटल बँक,...

डॉ. भागवत कराड । औरंगाबादसह सातारा, नागपूर, मुंबईत सुरू होणार डिजिटल बँक, डिजिटल व्यवहारांना चालना

देशभरात ७५ ठिकाणी डिजिटल बँक सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रात चार ठिकाणी डिजिटल बँक सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, नागपूर, सातारा आणि मुंबईमध्ये ही डिजिटल बँक सुरू करण्यात येणार आहे.

औरंगाबादमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने ही बँक सुरू करण्यात येणार आहे. या डिजिटल बँकिंगमुळे सर्व सुविधा ऑनलाइन स्वरूपात मिळणार असून त्यामुळे ग्राहकांचा वेळ देखील वाचणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंंत्री डॉ.भागवत कराड यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली आहे. डॉ. भागवत कराड यांच्या माध्यमातून १६ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय बँकांची परिषद औरंगाबादमध्ये भरवण्यात आली होती. त्याला सर्व बँकांचे अध्यक्षही उपस्थित होते. त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. ज्या शहरात जी अग्रणी बँक असेल ती बँक डिजिटल बँक सुरू करणार आहे.

चेक क्लिअरिंगसाठी वाट पाहण्याची गरज नाही : डिजिटल बँकिंगचे फायदे सांगताना डॉ कराड म्हणाले, चेक क्लिअरिंगसाठी वेळ लागत होता. मात्र आता या डिजिटल बँकेच्या माध्यमातून व्यवहार करताना चेक लगेच क्लिअर होणार आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ऑनलाइन होणार आहेत. या बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असणार आहे. तसेच सर्व मशिनरीच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार होतील.

बँकेत खाते उघडण्यापासून लोनपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध : याबाबत माहिती देताना आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांनी सांगितले की, या बँकेच्या माध्यमातून बचत खात्याअंतर्गत तसेच चालू खात्याअंतर्गत खाते उघडण्याची सुविधा असणार आहे. तसेच ग्राहकांसाठी बँकांचे सर्व डिजिटल किट उपलब्ध असणार आहेत. त्यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच व्यापाऱ्यांसाठी यूपीआय भीम आधार कोडच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. एमएसएमईच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

ही बँक औरंगाबादमध्ये सुरू करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. संबंधित यंत्रणेने त्यासाठी पाहणीदेखील केलेली आहे. या बँकांमुळे डिजिटल व्यवहारांना चालना मिळणार आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ऑनलाइन होणार आहेत. राज्यात औरंगाबाद, सातारा, नागपूर आणि मुंबईत डिजिटल बँक सुरू केली जाणार आहे. कमी मनुष्यबळात ही बँक सुरू करण्यात येणार असून बँकांच्या सर्व सुविधा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असणार आहेत. अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली आहे.