नागपूर ब्युरो : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्ञानवापीदरम्यान प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहावे, असा सवाल केला. ते म्हणाले, काही ठिकाणांबाबत आमची वेगळी श्रद्धा होती व आम्ही त्याबाबत चर्चा केली, पण रोज नवा मुद्दा आणू नये. ज्ञानवापीबाबत आमची श्रद्धा परंपरेतून चालत आली आहे. मात्र, प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहावे? तीही एक पूजा आहे. ज्यांनी ती पूजा अंगीकारली त्या मुस्लिमांचा बाहेरच्यांशी संबंध नाही. त्यांची पूजी तिकडची आहे, पण पूजा वेगळी असतानाही आमचे ऋषी-मुनी, राजे क्षत्रियांचे वंशज आहेत.
गुरुवारी नागपुरात संघ शिक्षण वर्ग तृतीय वर्ष-२०२२ च्या समारोप समारंभात भागवत म्हणाले, ज्ञानवापी आस्थेशी निगडित मुद्दा आहे. हा इतिहास आहे. तो आम्ही बदलू शकत नाही. तो ना आजच्या हिंदूंनी बनवला, ना आजच्या मुस्लिमांनी. इस्लाम बाहेरून आला व हल्लेखोरांसह आला. त्या हल्ल्यांमध्ये भारत स्वतंत्र होण्याची इच्छा असणाऱ्यांचे मनोधैर्य खचवण्यासाठी देवस्थानांची तोडफोड करण्यात आली. आजच्या मुस्लिमांचे त्या काळचे पूर्वजही हिंदू होते.