Home Nagpur नितीन गडकरी । तूम्ही वेळेत काम करीत नसल्याने आम्ही बदनाम होतो; अधिकाऱ्यांना...

नितीन गडकरी । तूम्ही वेळेत काम करीत नसल्याने आम्ही बदनाम होतो; अधिकाऱ्यांना धारेवर धरले

नागरीकांना पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनपाची आहे. पाणी उपलब्ध झाले पण वितरणाची जबाबदारी व्हिओलिया (ओसीडब्ल्यू) पार पाडत नाही. तुमचे काम समाधानकारक नाही. अधिकारी गांभीर्याने काम करीत नाही. वेळेत कामे केली जात नाही. त्यामुळे आम्ही बदनाम होत आहोत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

गडकरी यांनी शुक्रवारी (ता. त्यांच्या निवासस्थानी ओसीडब्ल्यूच्या पाणी वितरणाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी वितरणासाठी अजून पाईपलाईन टाकण्यात आली नाही. करारानुसार पाईपलाईन कंपनीला टाकणे आवश्यक असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. गेल्या 10 वर्षांपासून 24 बाय 7 योजना केवळ या कंपनीमुळे यशस्वी होऊ शकली नाही. त्याची कारणे काय? शहरातील एकाही भागाला 24 बाय 7 पाणीपुरवठा होऊ शकला नाही. प्रायोगिक स्तरावर एका झोनमध्ये ही योजना राबविली. पण तेथेही 24 तास पाणी नाही. केवळ कंपनीच्या नकारार्थी भूमिकेमुळे व लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कंपनीच्या कामात सुधारणा झाली नाही तर तुमचे कंत्राट रद्द करावे लागेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला.

या प्रसंगी गडकरी यांनी व्हिओलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीत यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला व आपली नापसंती व्यक्त केली. ओसीडब्ल्यूच्या संपूर्ण कार्यपध्दतीचेे त्रयस्थ संस्थेमार्फत अंकेक्षण करण्याचे निर्देशही गडकरी यांनी आयुक्तांना दिले. संपूर्ण शहरात 24 बाय 7 योजना कधी लागू होईल याची तारीख आणि योजना राबविण्याचा संपूर्ण कार्यक्रम देण्याचे निर्देश गडकरींनी दिले.

मागील 10 वर्षांपासून आम्ही सहकार्य करीत असताना केवळ योजना यशस्वी राबवू शकले नाहीत. लोक पैसे देण्यास तयार असताना त्यांना पाणी मिळत नाही, यासाठी कंपनी जबाबदार आहे.

शहराला 700 एमएलडी पाणीपुरवठा दररोज असताना केवळ 60 टक्के पाण्याचे बिलिंग होते. 40 टक्के पाणी कुठे जाते हे शोधण्यात कंपनी अपयशी ठरली असल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला.