राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून दैनंदिन रुग्णसंख्या पंधराशेच्या आसपास पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासन सतर्क झाले असून वेगवेगळ्या उपाययोजनांसाठी चाचपणी सुरू आहे. “कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली असली तरी काळजी घेऊन आणि आरोग्य विभागाच्या सल्ल्याने शाळा सुरू केल्या जातील,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी दिली.
वर्ष २०२२-२३ शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाच्या शाळा १३ जून, तर केंद्रीय मंडळाच्या शाळा ८ जूनपासून भरत आहेत. कानपूर आयआयटीने जुलै महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची प्रतिदिन संख्या ९०० च्या पुढे, तर राज्यात १४०० च्या पुढे गेली आहे. शुक्रवारी पनवेल येथे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काँग्रेसच्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पुन्हा एका चिंतेचा विषय आहे. शाळांसाठी नवी एसओपी (सुनिश्चित कार्यपद्धती) जारी करण्यात येईल. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल.’ विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत प्रश्न आहेत. लसीकरण वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी सल्ला घेण्यात येईल व त्यांनी सांगितलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे शाळा सुमारे दोन वर्ष बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याकरता काही दिवस राहिले आहेत. कोरोना रुग्णसंख्या देशभरात वाढत आहे. राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य कोरोना कृतिदल यांच्याशी शिक्षण विभाग सल्लामसलत करणार आहे. त्यानंतर खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील, असे गायकवाड म्हणाल्या.