नागपूर ब्युरो : महिला बचत गट उभारणे, महिला बचत गटामध्ये सहभागी होणे, हा एक प्रकारचा स्टार्टअप सुरू करणे आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला कलाटणी देणाऱ्या बचत गटांच्या शेकडो हातांनी, मेहनतीने काही तरी बनवले आहे. जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या सरस मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. मानकापूर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या विभागस्तरीय सरस मेळाव्याला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भेट दिली. ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादने नागपूरकरांना एकाच ठिकाणी उपलब्ध झाली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिला स्वयंसहाय्यता समूहांची स्थापना करण्यात येते. नागपूर जिल्ह्यात तब्बल १७,२४१ महिला स्वयं सहाय्यता समूह स्थापन करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील तसेच विभागातील महिलांनी उत्स्फूर्तपणे विभागीय सरस वस्तू व विक्री प्रदर्शनात सहभाग नोंदवला. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील कोसा साड्यासह विविध बांबू कला, लाकडी वस्तू व कृषी उत्पादने प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण राहिले. चंद्रपूर-गडचिरोली वर्धा येथील बचत गटांनी पारंपरिक वस्तूसोबतच बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध वस्तू तयार केल्या.
शंभराच्या वर उत्पादनांची ई-विक्री : शासनाच्या जीईएम आणि खासगी अॅमेझाॅन या ई-वस्तू विक्री प्रणालीवर नागपूर जिल्ह्यातील तब्बल शंभराच्या वर उत्पादने नोंदणी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्यांना ऑनलाइन वस्तू विक्री करण्याचा सुकर मार्ग उपलब्ध झाला आहे. जीईएम पोर्टलवर जवळपास ५० तर अॅमेझानवर पोर्टलवरही जवळपास ६० उत्पादने आहेत. त्यात कॉपर क्राफ्ट डिझाईन, शर्ट्स, लाखेच्या बांगड्या, लोणची, मिरची, हळद, धना पावडर, आवळा, मुरब्बा, मुखवास, गरम मसाले, लाकडी खेळणी इ. उत्पादने आहेत. ऑनलाइन विक्री प्रणालीच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यात ३९ ऑर्डर नोंदणीकृत समूहांना मिळाल्या आहेत, त्यातून त्यांना जवळपास ७८,५०० हजार रुपये मिळाले आहेत.