नागपूर ब्युरो : जगातील सर्वात वेगळे राजे म्हणून इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराज यांची नोंद घ्यावीच लागेल, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील शिवस्वराज्य दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते काल बोलत होते. ‘सामना’चे पत्रकार महेश उपदेव हे यावेळी प्रमुख अतिथी होते.
जगातील एकाही राजाला जे शक्य झाले नाही, अशा अनेक गोष्टी शिवरायांनी करून दाखविल्या, याकडे लक्ष वेधताना देशमुख म्हणाले की, वयाच्या सोळाव्या वर्षांपासूनच राजेपण राबविण्याची सुरुवात, अफजलखानाचा स्वहस्ते वध, आगऱ्याहून चतुराईने सुटका, प्रतापगडाच्या वेढ्यातून बाहेर पडणे यासारखे त्यांच्या आयुष्यातील अनेक थरारक प्रसंग इतर कोणत्याही राजाला प्रत्यक्ष अनुभवावे लागले नाहीत. म्हणून ते जगातील सर्वश्रेष्ठ राजे ठरतात.
शिवराज्याभिषेक हा हिंदवी स्वराज्याचा स्थापना दिनच आहे, याची ऐतिहासिक कारणमीमांसा करून ते म्हणाले- शिवाजी महाराज अधर्मविरोधी होते. अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात ते बाणेदारपणे, अतिशय सावधतेने उभे राहिले आणि अल्प आयुष्यातही खूप यशस्वी झाले.
विभाग प्रमुख डाॅ. मोईज हक यांनी प्रास्ताविक केले. प्रियांका ठाकरे या विद्यार्थिनीनेही तडाखेबंद भाषण दिले. लक्ष्मी कोल्हे यांनी सूत्रसंचालन करतानाच एक पोवाडा सादर केला. शिवरायांवरील निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. हे विजेते असे- प्रथम : अश्विनी देशकर, अर्पण पठाणे, द्वितीय : रूपाली मोहरकर, लिटी टाॅमसन, प्रियांका ठाकरे, तृतीय : तझीन खान, मनीष टेंभरे, अश्विनी खवशे.