पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले आहेत. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी मोदी आज देहू येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर देहूनगरीत कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. स्वच्छता व सुरक्षिततेची सर्व आवश्यक कामे झाल्यामुळे देहूचे रूप पालटले आहे.
देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. यावेळी राजभवनातील क्रांतिकारी गॅलरीचे उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर दिसणार आहेत.
पुण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत हेलिकॉप्टरने देहूत येणार आहेत. यासाठी झेंडे मळा येथे 3 हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. तेथून मोटारीने माळवाडी, परंडवाल चौक, मुख्य कमान मार्गाने ते 14 कमानीजवळ पोहोचतील. कमानीजवळ मोटारीतून पायी मंदिराजवळ पोहोचतील. येथे 400 वारकऱ्यांसमवेत लोकार्पण सोहळा पार पडेल. या सोहळ्यानंतर पुन्हा मोटारीने सभास्थानी येतील. येथे 22 एकरात मंडप उभारण्यात आला आहे. मध्यभागी दोन मोठे मंडप, स्टेज असून डावी आणि उजवीकडे दोन लहान मंडप टाकण्यात आले आहेत.