Home मराठी औरंगाबादमध्ये पेट्रोल फक्त 54 रुपये लिटर:खरेदीसाठी पंपावर नागरिकांची तोबा गर्दी

औरंगाबादमध्ये पेट्रोल फक्त 54 रुपये लिटर:खरेदीसाठी पंपावर नागरिकांची तोबा गर्दी

औरंगाबादमध्ये आज मंगळवारी पेट्रोलचे दर 108 रुपये असताना क्रांती चौकातील पंपावर ते चक्क 54 रुपये प्रति लिटरने मिळाले. त्यामुळे वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी केली. प्रचंड वाढलेल्या महागाईच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राबवलेला हा अफलातून उपक्रम चर्चेचा विषय ठरला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आज औरंगाबादेत मनसेकडून वाहनचालकांना फक्त 54 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल विक्री करण्यात आली. क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर सकाळी 8 ते 9 दरम्यान मनसेतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. मात्र, गर्दी वाढल्यानंतर ही वेळही वाढवण्यात आली. या संधीचा शहरातील अनेक वाहनधारकांनी लाभ घेतला. स्वस्त दराने पेट्रोल भरून घेण्यासाठी वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली. त्यामुळे क्रांती चौकातील पेट्रोल पंपापासून ते सिल्लेखाना चौकापर्यंत वाहनचालकांच्या रांगा लागल्या. मनसेच्या या उपक्रमाबाबत वाहनचालकांनीही आनंद व्यक्त करत आज किमान काही रुपयांची तरी बचत झाल्याचे समाधान व्यक्त केले.