Home मराठी राष्ट्रपती निवडणूक । पवारांच्या अध्यक्षतेखाली विरोधकांची उद्या बैठक, ममता गैरहजर राहण्याची शक्यता

राष्ट्रपती निवडणूक । पवारांच्या अध्यक्षतेखाली विरोधकांची उद्या बैठक, ममता गैरहजर राहण्याची शक्यता

राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत १२ पक्ष सहभागी होणार असून त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. ममता बॅनर्जींऐवजी तृणमूल काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता उपस्थित राहण्याचीही शक्यता आहे.

तृणमूल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, ममता बॅनर्जी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यांची शरद पवारांशीही चर्चा झाली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी १५ जून रोजी दिल्लीत बॅनर्जी यांनी बोलावलेल्या अशा प्रकारच्या पहिल्या बैठकीत देशाचे लोकशाही मूल्य कायम राखण्यासाठी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार देण्याचे ठरले आहे.

या बैठकीत काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल, झामुमो, राष्ट्रीय लोकदल आणि डाव्या दलांचे नेते सहभागी झाले होते.