गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या शिवसेनेतील बंडाळी नाट्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्वाधिक आमदारांचे पाठबळ मिळवल्यानंतर आता पक्ष वाचवण्याचे ठाकरेंसमाेर आव्हान असेल. म्हणूनच ‘एकही आमदार किंवा शिवसैनिक नाराज असेल तर मुख्यमंत्रिपदच काय, पक्षप्रमुखपद सोडण्यासही आपण तयार आहोत, फक्त त्यांनी समोर येऊन तसे सांगावे,’ असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी बुधवारी ऑनलाइन संवादातून केले. जनतेशी संवाद साधून आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण त्यांनी दिले.
दुसरीकडे, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, आघाडी बहुमत सिद्ध करेल, असा दावा केल्याने शिवसेनेच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम राहिला.
‘बाळासाहेबांची शिवसेना आज राहिली नाही,’ हा आरोप फेटाळताना उद्धव म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर २०१४ मध्ये स्वबळावर लढलो, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ६३ आमदार निवडून आणले. त्यानंतर बाळासाहेबांच्या काळातील अनेक शिवसैनिकांना याच शिवसेनेमुळे पदे मिळाली,’ याची आठवण त्यांनी करून दिली. हिंदुत्वाला तिलांजली देत सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, असा आरोप भाजप व शिंदे करतात. तो खोडून काढताना उद्धव म्हणाले, ‘हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. आदित्य हे एकनाथ शिंदे व इतर नेत्यांसह अयोध्येला जाऊन आले, ते हिंदुत्वासाठीच’ अशी आठवण त्यांनी करून दिली.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ : शरद पवार, सोनिया गांधी यांनी विश्वास टाकल्यामुळे मी मुख्यमंत्रिपद स्वीकारले. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे बाळासाहेबांना दिलेले वचन मी पूर्ण करू शकलो. मात्र काही लोक शिवसेनेच्या लाकडाचा दांडा वापरून आपल्याच पक्षावर घाव घालत आहेत, ते मला नकोय. म्हणूनच शिवसेनेचा एक जरी आमदार म्हणत असेल की मी मुख्यमंत्री म्हणून किंवा पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे, तर मी ही दोन्ही पदे सोडण्यास तयार आहे. फक्त त्यांनी समाेर येऊन बोलावे. मी त्यांना अजूनही आपले मानतो, त्यांनीही मनात जे आहे ते स्पष्ट बोलावे. अजूनही कोणी शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी पद सोडण्यास तयार आहे, असा पुनरुच्चारही ठाकरेंनी केला. लोकशाहीत संख्या महत्त्वाची असते, मात्र माझ्यासाठी सत्ता व संख्या गौण आहे. जनतेचे प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. हे प्रेम कायम ठेवा, असे आवाहनही त्यांनी जनतेला व शिवसैनिकांना केले.