Home मराठी #Maha_Metro | अबब… एका दिवसात 65000 पेक्षा जास्त नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास

#Maha_Metro | अबब… एका दिवसात 65000 पेक्षा जास्त नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास

नागपूर मेट्रोची रेकॉर्ड रायडरशीप, जुने सर्व रेकॉर्ड मोडत नवीन रेकॉर्ड स्थापित

नागपूर ब्युरो : नागपूर मेट्रो अंतर्गत असलेल्या प्रवासी संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीने आज शिखर गाठले आणि आज (२६ जून) मेट्रोची प्रवासी संख्या ६५००० इतकी विक्रमी होती. प्रवासी संख्या वाढावी या करता महा मेट्रो तर्फे सर्वंकष होणाऱ्या प्रयत्नांचेच हे फलित आहे. या आधी २६ जानेवारी रोजी मेट्रोने ६०,००० हि सर्वोच्च प्रवासी संख्या गाठली होती. आज जुने सर्व विक्रम महा मेट्रो नागपूर ने अभूतपूर्व असा पल्ला गाठला आहे.

नागपूरकरांच्या सहकार्यानेच हा पल्ला गाठला आहे. या मागे मेट्रोच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची अनेक दिवसांची मेहनत आहे. नागपूरकरांना उत्कृष्ट सेवा मिळावी आणि त्यांनी याचा भरपूर लाभ घ्यावा या दृष्टीने महा मेट्रोने सातत्याने अनेक उपाययोजना केल्या.

फिडर सेवा: लास्ट माईल आणि फर्स्ट माईल कनेक्टिव्हीटी अंतर्गत महा मेट्रोने स्थानकावर फिडर सेवा उपलब्ध करून दिली. या अंतर्गत सायकल, इ-सायकल, इ-स्कूटर, इ-रिक्षा सारखे पर्याय प्रवाश्यांना दिले. या सोईंचा लाभ सरसकट सर्व प्रवाशांना तर झालाच पण विशेषतः मिहान भागात कार्यरत असलेल्या आणि हिंगणा परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ झाला.

मेट्रो सेवेच्या वेळा वाढवल्यात: प्रवाश्यांच्या मागणीचा महा मेट्रोने नेहमीच गांभीर्याने विचार केला आहे. म्हणून महा मेट्रोच्या वेळापत्रकात प्रवाश्यांच्या गरजे प्रमाणे बदल करण्यात आले. सध्या मेट्रोच्या दोन्ही ऑरेंज आणि ऍक्वा मार्गिकेवर सकाळी ६.३० ते रात्रौ १० वाजे पर्यंत मेट्रो सेवा असते. विशेषतः रविवारी सारख्या सुटीच्या दिवशी प्रवाश्यांचा ओघ बघता मेट्रो गाड्यांच्या वेळात त्या प्रमाणे बदल करण्यात आले.

मेट्रो संवादचे आयॊजन केले: प्रवाश्यांच्या दृष्टीने आणि त्यांच्या गरजे प्रमाणे अनेक बदल केले असले तरीही ते सर्व बदल मेट्रो प्रवाश्यांपर्यंत पोचवणे अतिशय गरजेचे होते. यावर तोडगा म्हणून मेट्रोने शैक्षणिक संस्था, व्यावसायिक प्रतिष्ठान, शासकीय कार्यालय, रुग्णालय अश्या अनेक ठिकाणी मेट्रो संवाद कार्यक्रमाचे आयोजन करत प्रवाश्यांसंबंधी या सर्व आवश्यक बाबींची माहिती संबंधित वर्गांपर्यंत पोचवली.

महा कार्ड: डिजिटल पेमेंट हि काळाची गरज ओळखत महा मेट्रोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साहायाने महा कार्डची सोय आपल्या प्रवाश्यांपर्यंत करून दिली. महा कार्डाच्या सोयीमुळे प्रवाशांना मेट्रोने प्रवास करणे अधिक सोपे झाले.

मोबाईल ऍप: महा कार्ड सोबत महा मेट्रोने मोबाईल ऍप ची सोया देखील प्रवाश्याना करून दिली. यामुळे देखील मेट्रोने प्रवास करणे अधिकच सोपे झाले कारण महा कार्ड आणि मोबाईल ऍप मुळे तिकीट काढण्याकरता रांगेत उभे राहण्याची गरज उरली नाही आणि म्हणून मेट्रोने प्रवास अधिक सुखकर झाला.

स्टेशन अँबॅसेडर – मेट्रोच्या विविध बाबींची माहिती समाजातील विविध घटकांपर्यंत पोचावी या करता मेट्रो तर्फे `स्टेशन अँबॅसेडर’ संकल्पना राबवली. या अंतर्गत प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या परिधीत असलेल्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीला स्टेशन अँबॅसेडर म्हणून सन्मान दिला. या सोबत मेट्रोचे अधिकारी देखील या कामाकरता नेमले.

विविध कार्यक्रमांचे आयोजन: एकीकडे हे सर्व प्रयत्न होत असताना दुसरीकडे, मेट्रो प्रवासा दरम्यान प्रवाश्यांना विरंगुळा म्हणून मेट्रो स्थानकांवर गाण्याचे कार्यक्रम सारख्या विविध उपक्रमांचे आयोजन केले. या शिवाय समाजातील विविध घटकांचे मेट्रो राईड, सारखे बाबींचे आयोजन देखील महा मेट्रोने केले.
उल्लेखनीय आहे की महा मेट्रोने एम्स, आयआयएम, मिहान येथील विविध कंपन्या तसेच हिंगणा येथील विविध कॉलेज मेट्रो व फिडर सर्विसच्या माध्यमाने जोडले आहे.

नागपूरकरांना प्रवासाची योग्य सोय मिळावी या करता महा मेट्रो तर्फे सातत्याने प्रयत्न होत असतात. आज मेट्रोने प्रवासी संख्येच्या बाबतीत एक महत्वाचे टप्पा असून येत्या काळात हा आकडा याच प्रमाणे वाढणार असल्याचा विश्वास देखील आहे.