सुमारे दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेली महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ आता संपुष्टात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. आज सकाळी 11 वाजता फडणवीस यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस एक-दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.
बुधवारी रात्री 11.15 च्या सुमारास उद्धव ठाकरे स्वत: राजीनाम्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले होते. त्यांच्यासोबत कारमधून आदित्य आणि तेजस ठाकरे आणि शिवसैनिक देखील होते. राज्यपालांकडे राजीनामा सोपवून उध्दव ठाकरे आणि शिवसैनिकांचा ताफा मातोश्रीकडे रवाना झाला आहे.
जेव्हा उद्धव राज्यपालांकडे राजीनामा देण्यासाठी पोहोचले तेव्हा राज्यपालांनी त्यांना पुढील मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांच्या पदावर राहण्यास सांगितले. राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मुलगा आदित्य यांच्यासह मंदिरात पूजा केली. यानंतर ते मातोश्री या निवासस्थानी पोहोचले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनाम्याची घोषणा केल्या नंतर मुंबईत सीआरपीएफच्या 2000 जवानांना पाचारण केल्याचे ऐकिवात आहे. बहुधा बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी त्यांना पाचारण केले असावे. हे अत्यंत लाजीरवाणे आहे. किमान मुंबईच्या रस्त्यावर रक्तपात होणार नाही याची काळजी घ्या. अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच संजय राऊत यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ”मी शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलाला सांभाळून घेतले, मार्गदर्शन केले, स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली. सत्ता येते सत्ता जाते, अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
राजकारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः भाषण करुन लोकांशी संवाद साधून राजीनाम्याची घोषणा केली आहे. येत्या काळात सर्वांना सोबत घेऊन काम करु. गोर गरीबांसाठी ठाकरे यांनी काम केले. कोरोना काळात एक मुख्यमंत्री कसे काम करु शकतो याचे चांगले उदाहरण त्यांनी दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ठाकरे दिर्घकाळ जनतेच्या लक्षात राहतील.