विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची पहिली लढाई जिंकल्यानंतर आज विधानसभा सभागृहात भाजप-शिंदे गटाची बहुमत चाचणी होणार आहे. आज बहुमतासाठी शिंदे गटाकडून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह 16 आमदारांना व्हीप बजावणार असल्याचे कळते. या आमदारांनी व्हीप पाळला नाही तर त्यांची आमदारकी रद्द करण्याची प्रक्रिया शिंदे गट करू शकतो. दरम्यान, या निर्णयाविरोधात कोर्टात जाऊ, असे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द केल्याचे पत्र रविवारी रात्री उशिरा काढले. पत्रानुसार, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते, तर भरत गोगावले हे प्रतोद असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बहुमत चाचणीपुर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि महाराष्ट्र भाजपच्या आमदारांची रविवारी रात्री मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदजारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे गटनेते आणि मुख्य प्रतोद यांची नियुक्तीच रद्द केल्याने 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या 16 आमदारांच्या अपात्रेचा मुद्दाही निकाली निघण्याची शक्यता आहे. कारण याच गटनेत्यांनी बंडखोरांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका केली होती.
रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजप व शिंदेसेना गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी 164 मते घेत विजय प्राप्त केला, तर सेनेचे राजन साळवी यांना 107 मते मिळाली. एकूणच, आज होणारी बहुमत चाचणी ही केवळ औपचारिकता असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी 12 आमदार गैरहजर होते. बहुमताच्या चाचणीला यातील काही हजर राहू शकतात. मात्र, त्यांच्या येण्याने अन् न येण्याने बहुमत चाचणीवर काहीएक परिणाम होणार नाही. कारण सरकारला बहुमतासाठी 145 सदस्यांचे पाठबळ लागते. अध्यक्ष निवडीत सत्ताधाऱ्यांना 164 सदस्यांचे पाठबळ मिळाले आहे.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला 12 आमदार अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादीचे 7, भाजपचे 2, काँग्रेस-एमआयएमचे प्रत्येकी 1 आमदार गैरहजर राहिले. राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे ते मतदानाला हजर राहू शकले नाहीत. नीलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, बबन शिंदे, अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित होते. भाजप मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे गैरहजर होते. प्रणिती शिंदे, एमआयएमचे इस्माईल कास्मी आदी आमदारांची अनुपस्थिती होती.