सावनेर तालुक्यातल्या नांदा गोमुख गावाजवळ नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात लग्नाला आलेले स्कार्पिओमधील वऱ्हाड वाहून गेल्याची धक्कादयक घटना मंगळवारी सायंकाळी घडलीय. या गाडीत आठ प्रवासी होते. त्यातल्या तिघांचे मृतदेह हाती लागलेत.
बचाव पथकाचे सदस्य नाल्याच्या पाण्यात उतरले असून, बचाव कार्य सुरू आहे. बातमी लिहिपर्यंत बचाव पथकाच्या हाती तीन जणांचे मृतदेह लागल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या नांदा गाेमुख गाव आहे. या गावाजवळच्या नाल्याला पूर होता. पुलावरून पाणी वाहत होते. हे दिसत असूनही, चालकाने भर पाण्यातून गाडी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात गाडी वाहून गेली. मध्य प्रदेशातील हा परिवार नांदा गोमुख येथे लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी आलेला होता. स्कार्पिओतून सर्वजण मध्य प्रदेशात परत जात होते. त्यावेळी हा अपघात घडला.
मागील दोन ते तीन दिवसांपासून मध्यप्रदेश व महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नदी नाल्यांना पूर आलेला आहे. सावनेर तालुक्यातील कन्हान नदीचाही जलस्तर वाढत असल्याने आजूबाजूच्या नदीनाल्यांना पूर आला आहे. नांदा गोमुख येथील नाल्याला पूर आलेला दिसत असतानाही स्कार्पिओ चालकाने गाडी टाकल्याने हकनाक जीव गेले. माहिती मिळताच महसूल, पोलिस तसेच आपत्ती निवारण पथक शोधकार्यात गुंतले आहे.