Home Award Chandrapur | पत्रकारांना आणखी सुवर्ण संधी, श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार प्रवेशिकेला मुदत...

Chandrapur | पत्रकारांना आणखी सुवर्ण संधी, श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार प्रवेशिकेला मुदत वाढ

चंद्रपूर ब्युरो : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे ग्रामीण वार्ता पुरस्कार, शुभवार्ता पुरस्कार, मानवी स्वारस्य अभिरूची वृत्तकथा, वृत्त छायाचित्र, दुरचित्रवाणी, डिजिटल मीडीया (portal) साठी उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख आता वाढवून
20 जुलै 2022 पर्यंत करण्यात आली आहे. तसेच ह्यापूर्वी पुरस्कार मिळालेल्या स्पर्धकांनाही स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.

शिक्षणमहर्षी तथा माजी आमदार स्व. श्रीहरी बळीराम जीवतोडे स्मृतीप्रित्यर्थ ग्रामीण वार्ता पुरस्कार स्पर्धेत चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण वार्ताहर भाग घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी परिणामकारक वृत्त, वार्तापत्र, वृत्तमालीका ग्राह्य धरण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रथम, व्दितीय आणि तृतीय अशा तीन पुरस्कारांसह दोन प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. रोख पुरस्कार स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्व. छगनलाल खंजांची स्मृती शुभवार्ता पुरस्कार केवळ चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी असून, विधायक विषयावर झालेले लिखाण यासाठी पात्र समजण्यात येईल. तसेच स्वर्गीय सुरजमलजी राधाकिशन चांडक स्मृति प्रित्यर्थ ‘मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार ‘ देण्यात येणार असून, रोख पुरस्कारासह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही स्पर्धा चंद्रपूर जिल्हयातील शहरी व ग्रामीण पत्रकारांसाठी खुली राहील.

इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रायोजित हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धाही घेण्यात येणार असून, ज्यांचे छायाचित्र प्रादेशिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे, असे छायाचित्रकार यात भाग घेऊ शकतात. रोख पुरस्कारासह स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्व. सुशिला राजेंद्र दीक्षित स्मृतिप्रित्यार्थ उत्कृष्ट वृत्तांकन (टी. व्ही.) पुरस्कार दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीवर चंद्रपूर जिल्हयातील प्रसारीत बातमी ग्राह्य धरण्यात येईल. स्पर्धेसाठी आपल्या बातमी पेनड्राईव्ह मध्ये आपल्या अर्जासह चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ कार्यालयात सादर कराव्यात. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिकेबाबत उत्कृष्ट वृतांकन पुरस्कार (टेलोव्हीजन) असा ठळक उल्लेख करावा.

स्व.राजकुंवर उदयनारायण सिंह स्मृति प्रित्यर्थ के.के.सिंह यांच्या वतीने डिजिटल मीडीया (portal) करिता शोध पत्रकारितासाठी प्रथम व व्दीतीय असे दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख रक्कम ,स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.पोर्टलधारकांनी पोर्टलवर प्रकाशित झालेली बातमीची प्रिंट 4 प्रतीत अर्जासह प्रवेशिका म्हणून सादर करावी व प्रिंट आऊटवर पोर्टलचे लिंक असणे अनिवार्य आहे.

पुरस्कारासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत प्रकाशित झालेले लिखाण आणि छायाचित्रग्राह्य धरण्यात येईल. लिखाण मूळ स्वरूपात आवश्यक असून, भाषांतरीत नसावे. स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारे साहित्य मूळ प्रतीसह चार छायांकित प्रतित असावे. मूळ साहित्यावर नाव नसल्यास त्या कालावधीत संबंधित वर्तमानपत्राचा प्रतिनिधी असल्याचा पुरावा प्रवेशिकेसोबत जोडावा. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका सोबत आपली, बातमी कोणत्या स्पर्धेसाठी आहे. याचा स्पष्ट उल्लेख तपशीलवार करावा. सर्व प्रवेशिका 20 जुलै 2022 पर्यंत स्पर्धा संयोजक, चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघ जूना वरोरा नाका, चंद्रपूर या पत्यावर पाठवाव्या, असे आवाहन स्पर्धा संयोजक रमेश कल्लेपल्ली(9970893903), योगेश चींधालोरे (7972945149), राजेश निचकोल (9822721375) आणि कमलेश सातपुते (9860024266) यांनी केले आहे.