Home मराठी Maharashtra । विदर्भात पूरस्थिती, कोकण नियंत्रणात; चंद्रपूर जिल्ह्यात हजारो नागरिकांचे स्थलांतर

Maharashtra । विदर्भात पूरस्थिती, कोकण नियंत्रणात; चंद्रपूर जिल्ह्यात हजारो नागरिकांचे स्थलांतर

राज्यात आतापर्यंत झालेला मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीत १०८ जणांचा बळी गेला असून लाखो किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दर पावसाळ्यात प्रभावित होणाऱ्या कोकणातील परिस्थिती यंदा नियंत्रित असून विदर्भात मात्र पूरस्थिती कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या ७०० ते ८०० नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत असून एसडीआरएफची एक टीम आणि स्थानिक टीमच्या साहाय्याने वर्धा नदीपात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने दिली.

नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात सध्याची परिस्थिती आटोक्यात आहे. परंतु मंगळवारी सायंकाळी ४ नंतर प्राणहिता नदीपात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून, पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

चंद्रपूर जिल्हयात सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी वर्धा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. मूल तालुक्यातील १२ लोक शेतात अडकले असून त्यांचे बचाव कार्य सुरू आहे. चंद्रपूर, वरोरा आणि भद्रावती येथील ७०० ते ८०० नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनची एक टीम आणि स्थानिक टीमच्या साहाय्याने वर्धा नदीपात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १३६ मिमी एवढा सरासरी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या बचावाकरिता एक एनडीआरएफ टीम व एक एसडीआरएफ टीम तैनात करण्यात आली आहे. आतापर्यंत ३९७ लोकांना १० निवारा केंद्रांत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

राज्यात पुरामुळे २८ जिल्हे आणि २८९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत १२ हजार २३३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे १८९ प्राणी दगावले आहेत. पावसामुळे ४४ घरांचे पूर्णत: तर १ हजार ३६८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी

विदर्भात पावसाचे थैमान सुरू आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांना भेटी देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी शेती व घरांचे नुकसान झाले. देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाटमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. स्थलांतरीत अतिवृष्टीग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. चंद्रशेखर बावनकुळे, रणजित कांबळे, समीर कुणावार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, सुनील गफाट आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातही फडणवीस यांनी पाहणी केली. नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.