द्रौपदी मुर्मूंची 15 व्या राष्ट्रपतिपदी निवड झाली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात (75 वे वर्ष) देशाने आदिवासी समुदायाच्या पहिल्या राष्ट्रपती निवडून इतिहास रचला. भारताने समाजाच्या सर्वात वंचित समुदायाच्या मुलीची देशाच्या प्रथम नागरिकपदी आणि तिन्ही सेना दलांच्या सर्वोच्च कमांडरपदी निवड करून लोकशाहीची ताकद दाखवली. गुरुवारी संसद भवनात 10 तासांच्या मतमोजणीत मुर्मू यांना 6,76,803 म्हणजे 64.03% मते मिळाली. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 3,80,177 मते (35.97%) मिळाली. मुर्मू देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. त्या सर्वात कमी वयात राष्ट्रपती (64 वर्षे 1 महिना 6 दिवस) झाल्या. यापूर्वी नीलम संजीव रेड्डी (64 वर्षे 2 महिने 6 दिवस) कमी वयात निवडले गेले होते.
- विरोधकांत घुसखोरी, मोठे क्रॉस व्होटिंग
{भाजपचा दावा : 125 विरोधी खासदार आणि 17 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले.
{आसाममध्ये 22, मध्य प्रदेशात 20, बिहार-छत्तीसगडमध्ये 6-6, गोव्यात 4, गुजरातमध्ये 10 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले.
{मुर्मू यांना सर्वाधिक मते यूपी, महाराष्ट्रातून मिळाली. सिन्हा यांना बंगाल, तामिळनाडूतून.
पाच वर्षांत तीन आपत्ती
ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूरमध्ये गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुर्मू या आयुष्यात अनेक आपत्तींवर मात करत भारतीय सेना दलांच्या सर्वोच्च कमांडर पदावर पोहोचणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. पाच वर्षांत पती आणि दोन मुलांच्या मृत्यूचे अपार दु:ख सहन करूनही द्रौपदी यांनी समाजाचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला. पती आणि मुलांच्या स्मरणार्थ त्यांनी निवासी शाळा स्थापन केली. याच शाळेत स्थापन केलेले पती-मुलांचे पुतळे.
घरी जाऊन पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुर्मू यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, आदिवासी जमातीत जन्मलेल्या मुलीने इतिहास घडवला. त्यांचे जीवन भारतीयांसाठी प्रेरणा आहे. त्या आशेचा किरण आहेत. दरम्यान, मुर्मू घटनेच्या रक्षक म्हणून कार्य करतील, अशी आशा विरोधी उमेदवार यशवंत सिन्हांनी व्यक्त केली.
मोदींचे आज स्नेहभोजन, 25 ला शपथ
24 जुलै रोजी कार्यकाळ पूर्ण करणारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदी शुक्रवारी स्नेहभोजन देतील. मुर्मू 25 जुलै रोजी शपथ घेतील.