Home मराठी पंकजा मुंडेंना लवकरच मोठी जबाबदारी:गिरीश महाजनांचे संकेत

पंकजा मुंडेंना लवकरच मोठी जबाबदारी:गिरीश महाजनांचे संकेत

489

”पंकजा मुंडे पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत त्यांना लवकरच मोठी जबाबदारी पक्षश्रेष्ठी देणार आहेत.” अशी स्पष्टोक्ती भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते जळगाव येथे माध्यमांशी बोलत होते. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही, त्यानंतर पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती, त्यावर हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

गिरीश महाजन म्हणाले, पंकजा मुंडे अजिबात नाराज नाहीत, त्यांच्या कामाची पक्षश्रेष्ठी दखल घेतली जात आहे. त्यानी मला अभिनंदनासाठी फोनही केला होता. ते नाराज आहेत असे हॅमर करु नये तसे चित्र लोकांसमोर जात आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामाची दखल घेत यापेक्षा चांगले पद देतील.

ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार सुरु असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसेंनी जळगावात केले होते. त्यांच्या या आरोपाला मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. तुम्ही म्हणजे संपूर्ण ओबीसी असे समजण्याचे काही एक कारण नाही. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला हा आरोप पूर्णतः चुकीचा असल्याचे म्हणत खडसेंवर महाजनांनी जोरदार निशाणा साधलाय.

गुवाहाटी, सुरतला गेलेले मंत्री हिंदुत्वासाठी तिकडे गेले होते. मंत्रिपद न मिळाल्याने त्यांना काही एक फरक पडलेली नाही. त्यांना हिंदुत्व जपायचे आहे, असा टोला आमदार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमात शिंदे गटाच्या मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांना लगावला होता. भाजपचे संकटमोचन असलेल्या नुकतेच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या गिरीश महाजन यांनी खडसेंच्या आरोपांना नाकारत त्यांना तिखट शब्दात उत्तर दिले आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच जळगावमध्ये आले होते. यावेळी नव्या सरकारचा येणाऱ्या काळातील अजेंडा त्यांनी स्पष्ट केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही दमदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुढेच जाणार. अडीच वर्षात खुंटलेला विकास आता होईल. हे डबल इंजिनचे सरकार असून रखडलेली सर्व विकासकामे आता मार्गी लागतील असेही ते म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराजी व्यक्त करत पंकजांना वरिष्टांना भेटण्याचा सल्लाही देऊन टाकलाय. ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे परिवाराशी निगडीत असलेल्यांवर सातत्याने अन्याय झाला. त्यामध्ये पंकजा मु्ंडेही येतात. आताही त्यांना मंत्रिमंडळात घेण्याविषयी शंका आहे. मंत्रिमंडळात येण्यासाठी त्यांनी काही काळ वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे.

पंकजा मुंडे कुठे नाराज आहेत, असा प्रश्न विचारत गिरीश महाजनांनी खडसेंच्या या आरोपांना थेट बगल दिली. पुढे ते म्हणाले, पक्षश्रेष्ठी त्यांचा विचार करतील. त्यांना मोठे पद मिळेल, असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर थोडीफार नाराजी असतेच मग ते एका पक्षाचे सरकार असले तरीही.