Home Azadi Ka Amrit Mahotsav #Nagpur | अमृत महोत्सवी वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सारेच संकल्पबद्ध होऊ या...

#Nagpur | अमृत महोत्सवी वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सारेच संकल्पबद्ध होऊ या : देवेंद्र फडणवीस

485

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनी उपमुख्यमंत्र्यांकडून ध्वजारोहण

नागपूर ब्यूरो : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आगामी 25 वर्षाचे नियोजन करण्याची ही योग्य वेळ आहे. मानवी चेहरा असणारा विकास देऊन बलशाली महाराष्ट्र निर्मितीचा संकल्प यावेळी करु या, असा संदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात दिला.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नागपूर येथील ऐतिहासिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम त्यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष हा अमृत काळ असून समाजाच्या उत्कर्षासाठी पुढच्या 25 वर्षांमध्ये करायच्या कामांचे नियोजन करण्याची ही संधी आहे, असे सांगून ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक, ओबीसी, शेतकरी, महिला, विद्यार्थी, कामगार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आमची वाटचाल असेल.

 

 

स्वातंत्र्यसंग्रामात नागपूर शहराने अभिमानास्पद भूमिका बजावली. नागपूर शहराने ‘चले जाव’ चळवळीत मोठे योगदान दिले. अनेक जण शहीद झाले. त्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानापुढे आम्ही नतमस्तक आहोत. नागपूरच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. नागपूर बदलत असल्याचा अनुभव आपण घेत आहोत. मेट्रोपासून अनेक पायाभूत सुविधांचा विकास सर्वांपुढे आहे. मात्र या विकासातून प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे सध्या शेतकरी त्रस्त आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दुप्पट मदत जाहीर केली आहे, असे सांगून ते म्हणाले, केवळ हीच नव्हे तर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी, दुरुस्तीसाठी, जनावरांच्या नुकसानासाठी सुद्धा मदत केली जाईल. येत्या काळात महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम केले जाणार आहे. हे करताना विदर्भाच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले जाईल. विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी दिली जाईल. या ठिकाणी गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केले जातील. नागपूर हे ‘एज्युकेशन हब’ होत आहे. दर्जेदार शिक्षणाचे केंद्र होत आहे. शिक्षण दर्जेदार असेल तर उत्तम कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण होईल. उद्योग व्यवसाय येतील. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. नागपुरातील तरुणांच्या हाताला काम मिळेल. यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृत महोत्सवी वर्षात आगामी 25 वर्षाचे नियोजन करताना मानवी चेहरा असणारा विकास हे उद्दिष्ट आम्ही ठरवले आहे. बलशाली महाराष्ट्र, ‘ट्रिलियन इकॉनॉमी’ असणारा महाराष्ट्र निर्मितीचा आमचा निर्धार आहे. मात्र हे सर्व करताना शेवटचा वंचित माणूस हेच आमचे विकासाचे असेल. शहर व ग्रामीण भागाचा समतोल विकास हेच उद्दिष्ट असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात नागपूरकर जनतेने उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले, कौतुक केले. उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांचा, शहीद माता-भगीनींना त्यांनी अभिवादन केले. ते म्हणाले, तिरंगा आमची आन-बान-शान आहे. या अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्रभक्तीची भावना मनामनात तेवत ठेऊन एकमेकांना सोबत घेऊन ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ घडवण्यासाठी सिद्ध होऊ या, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना बक्षीस वितरण केले. यामध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील विद्यार्थी, केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत राज्यातील स्वच्छ विद्यालयाचा पुरस्कार त्रिमूर्ती नगर नागपूरला मिळाला आहे. त्यांच्या प्राचार्याचा सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डागा मेमोरियल शासकीय रुग्णालय, आशा हॉस्पिटल कामठी, महाआवास योजनेत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कार्य करणारी उत्कृष्ट पंचायत समिती रामटेक, राज्य पुरस्कृत प्रथम क्रमांक मिळवणारी पंचायत समिती नागपूर ग्रामीण, उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून खेडी गोवर्धन व राज्यस्तरीय योजनेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारी सावनेर तालुक्यातील ग्रामपंचायत किरणापूर, सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून मुकेश तुकाराम तुरकर हिंगणा, मयूर शैलेंद्र कोल्हे रामटेक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नासुप्रचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आदिवासी विकास अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, माहिती आयुक्त राहुल पांडे, माजी आमदार एस. क्यू. जमा, स्वातंत्र्य सैनिक यादवराव देवगडे यांच्यासह प्रशासनातील केंद्र व राज्य शासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. उपस्थित मान्यवरांच्या भेटी घेतल्या.