पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी व विरोधकांत चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून सरकारविरोधात नारेबाजी केली. त्यावर सत्ताधाऱ्यांनीही उपरोधिकपणे त्यांचे चिमटे काढले. विशेषतः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवल्यानतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तेवढ्याच आक्रमकपणे त्यांच्यावर पलटवार केला. यामुळे आजच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी व विरोधतांत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तारास झालेला विलंब यासह अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्यास झालेला विलंब असे विविध प्रश्न विरोधकांकडून पावसाळी अधिवेशनात उपस्थित केली जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यावरुन विरोधक आक्रमक पवित्र्याच्या भूमिकेत आहेत. काल सरकारच्या विरोधात पाऱ्यावर घेतलेली आक्रमक भुतिका आज अधिक तीव्र होण्याचा शक्यता आहे.