विदर्भ साहित्य संघ – ग्रंथालयाचा द्विदिवसीय वार्षिक वाचन मेळावा
नागपूर= विदर्भ साहित्य संघ ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक मेळाव्याचे 20 व 21 ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले असून विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील अमेय दालनात विविध कार्यक्रम त्यानिमित्ताने घेण्यात येणार आहेत.
मेळाव्याचे उद्घाटन 20 तारखेला सायंकाळी 6 वाजता अमेय दालनात होणार असून उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध कवी सौमित्र यांची प्रफुल्ल शिलेदार आणि विवेक अलोणी प्रकट मुलाखत घेणार आहेत. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर व ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. पराग घोंगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रविवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ‘गीत सौरभ’ या संगीत कार्यक्रमात गुणवंत घटवाई, मंजिरी वैद्य, रसिका करमाळेकर व डॉ. वैशाली उपाध्ये, राजेश खिंची हे गायक कलावंत कवी सुरेश भट, ग्रेस, शांता शेळके, शंकर रामाणी आणि राजा बढे यांच्या लोकप्रिय गीतरचना सादर करतील. त्यानंतर ‘काव्यनाद’ हा काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. यात नामवंत कवींच्या कवितांचे वाचन विनय मोडक, सुषमा मुलमुले, शलाका जोशी, नकुल जोशी करणार असून स्वाती भालेराव आणि चमू त्यावर नृत्य सादर करतील.
याच कार्यक्रमात विदर्भातील समाज ऋषींच्या स्मृतींचा जागर करणारा अभिवादनपर कार्यक्रम होणार आहे. त्यात बाबा आमटे यांच्या प्रार्थनेचे समूह गायन, संत गाडगेबाबांचे कीर्तन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांच्या भाषणाचे अभिवाचन अनुक्रमे नीरजा वाघ, डॉ.अंजली भांडारकर, गौरी सोनटक्के, रसिका करमाळेकर, मकंरद हरदास आणि डॉ. वसुधा वैद्य सादर करतील.
त्यानंतर शांताराम उपाख्य के.ज. पुरोहित यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कथेचे अभिवाचन डॉ. विनिता हिंगे करणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालय संचालक प्रा. विवेक अलोणी यांनी केले आहे.