विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. तत्पूर्वी मुंबईत झालेल्या गोविंदाच्या मृत्यूवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीदरम्यान जखमी होणाऱ्या गोविंदांना 7 लाख तर, मृत गोविंदांना 10 लाखांची मदत करण्याची घोषणा केली होती. विलेपार्ल्यातील एका दहीहंडीत थर कोसळून एक गोविंदा गंभीर जखमी झाला होता. त्याचा आता मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. मात्र, या गोविंदाला अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे सभागृहात हा मुद्दा मांडणार आहोत.
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीच्या आदल्याच दिवशी गोविंदांचा 10 लाखांचा विमा काढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे गोविंदा पथकांना विमा काढण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे अशा गोविंदांना सरकारने स्वत:हून आपल्या तिजोरीतून मदत करावी, अशी मागणी आम्ही सभागृहात करणार आहोत.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. मात्र, सरकारने त्यांच्यासाठी जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी, यासाठी तसेच इतर अनेक मुद्द्यांवर लक्षवेधी मांडणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.