राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील तीन -चार दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे, अशी माहिती के.एस.होसळीकर यांनी ट्विट करत दिली आहे.
मुसळधार पावसाने अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांना जोडणारे रस्त्यावर पाणी आल्याने याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेली 2 दिवस पुणे, कोल्हापूर, मुंबई, रायगड, रत्नागिरी,नंदूरबार, वर्धा, अहमदनगर, बुलडाणा या भागात पावसाने चांगलेच झोडपले आहे. तर आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणालाही ऑरेज् अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक आणि पालघर जिल्ह्यांनाही ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रिय
पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगडमध्ये आज आणि उदया (गुरुवारी) ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरीमध्ये आज (बुधवारी) ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज दिसून येत आहे.