संपूर्ण विदर्भात आडिशन्स : सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू, १२ आक्टोबरला नागपुरात अंतिम फेरी, सलील कुलकर्णींची उपस्थिती
नागपूर ब्युरो : पी.जी. दंदे चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित डॉ. दंदे फाउंडेशनच्या वतीने येत्या बुधवारपासून (२१ सप्टेंबर) ‘व्हॉईस आफ लिटील मास्टर्स’ या विदर्भस्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आडिशन्स संपूर्ण विदर्भात होणार असून बुधवारी चंद्रपूर येथून सुरुवात होईल. स्पर्धेची अंतिम फेरी १२ आक्टोबरला नागपूर येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे, अशी माहिती डॉ. दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांनी दिली आहे.
डॉ. दंदे फाउंडेशनच्या वतीने सलग दोन वर्षे आनलाईन गायन स्पर्धा घेण्यात आली. या दोन्ही स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला. यंदा ही स्पर्धा विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. ७ ते १६ वर्षे वयोगटासाठी ही स्पर्धा आहे. २१ सप्टेंबरला चंद्रपूर, २२ सप्टेंबरला वर्धा व अकोला, २३ सप्टेंबरला यवतमाळ व वाशीम, २७ सप्टेंबरला अमरावती तसेच २९ व ३० सप्टेंबरला नागपूर येथे या आडिशन्स होणार आहेत. प्रत्येक केंद्रावर विदर्भाच्या विविध भागांमधील प्रथितयश गायक परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आडिशनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येईल. १२ आक्टोबरला नागपुरात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी विदर्भातील सर्वोत्तम गायक निवडण्यात येतील. अंतिम फेरीत २१ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार, ११ हजार रुपयांचा द्वितीय तर ५ हजार ५०० रुपयांचा तृतिय पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जातील. या स्पर्धेत ५० हजार रुपयांहून अधिक रोख पुरस्कार दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८७६७९२९६०७, ८३८००९२१३६ किंवा ७७६७०९०१३३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
शालेय शिक्षकांसाठीही स्पर्धा
याचवेळी विदर्भातील प्रत्येक केंद्रावर शालेय शिक्षकांच्याही आडिशन्स होतील. त्यांचीही अंतिम फेरी १२ आक्टोबरला नागपूरला होईल. यात कुठल्याही विषयाचे शिक्षक सहभागी होऊ शकतात. मात्र त्यांचे प्रवेश शाळांनी निश्चित करायचे आहेत. शिक्षकांसाठी २०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे.
सलील कुलकर्णी विशेष आकर्षण
१२ आक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला सुप्रसिद्ध गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असेल. पुरस्कार सोहळ्यापूर्वी सलील कुलकर्णी यांचा ‘माझे जगणे होते गाणे’ हा गाणी व गप्पांचा कार्यक्रम होईल. कवी नितीन भट त्यांच्याशी संवाद साधतील.
आडिशन्सचे वेळापत्र
- २१ सप्टेंबर : चंद्रपूर – रोटरी हॉल, रेडक्रॉस भवन
- २२ सप्टेंबर : वर्धा – स्कूल आफ स्कॉलर्स व शिववैभव सभागृह
- २२ सप्टेंबर : अकोला – आयएमए हॉल, सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या जवळ
- २३ सप्टेंबर : यवतमाळ – स्कूल आफ स्कॉलर्स, शुभम कॉलनी
- २३ सप्टेंबर : वाशीम – रेखाताई राष्ट्रीय विद्यालय, अकोला नाका रोड
- २७ सप्टेंबर : अमरावती – श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजी नगर
- २९ सप्टेंबर : नागपूर – स्कूल आफ स्कॉलर्स कब्स, रोटरी गार्डनपुढे, प्रतापनगर