नागपूर पोलिसांच्या वतीने ऑपरेशन नारको फ्लॅश आउट हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नार्कोटिक्स प्रकरणात म्हणजेच अमली पदार्थांची विक्री आणि त्याचे वितरण करण्याच्या प्रकरणात यापूर्वी पोलिसांच्या कारवाईत आढळलेल्या लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
नागपूर शहरात यापूर्वी ११०० च्या जवळपास लोकांचा गेल्या काही वर्षात अमली पदार्थांच्या विक्री आणि वितरणात सहभाग असल्यास आढळला होता. यापैकी जवळपास ११० लोकांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व लोक सध्या अमली पदार्थाच्या व्यवसायात निगडित आहेत की, त्यांनी हा व्यवसाय सोडला याची चौकशी सध्या पोलीस करणार आहेत. याशिवाय पोलिसांनी एक व्हाॅट्सअप नंबरवर अमली पदार्थासंदर्भात कुठलीही माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर शहरातील हुक्का पार्लर्स, धाबे किंवा कॉफी शॉपमध्ये कुठल्याही पद्धतीने लपून-छपून जर अमली पदार्थाची विक्री किंवा सेवन होत असल्यास नागरिकांनी त्याची तक्रार या व्हाट्सअप नंबर वर करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे . फार्मसी मधून काही औषधांचे अति प्रमाणात सेवन करून नशा करण्याचे प्रकारही काही नागरिक करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे, त्यामुळे मेडिकल शॉप्स मधून जास्त प्रमाणात ज्या औषधाने नशा होते असे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि प्रिस्क्रिप्शननुसारच देण्यात यावे असेही पोलिस आयुक्तांनी आदेश काढले आहेत, असे औषध जास्त प्रमाणात देणाऱ्या फार्मसी स्टोअर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. नागपूर पोलिसांनी यापूर्वीही अनेकविध सर्च ऑपरेशन करीत वेगवेगळ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना अटक केली आहे.