नागपूर जिल्ह्यातील शक्तीपीठ कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्यावतीने लवकरच अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. येथील 164 खोल्यांच्या भक्तनिवासात श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्ज अॅण्ड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लाँट हॉस्पिटल उभारले जाणार आहे. त्यासाठीची इमारत ट्रस्टला हस्तांतरीत करण्यात आली आहे. यामाध्यमातून मध्यभारतात प्रथमच ऑर्गन ट्रान्सप्लाँटची सुविधा उपलब्ध होणार असून त्याचा लाभ जनतेला होणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी व मंदिर संस्थानचे अध्यक्ष आ. बावनकुळे यांनी हस्तांरण करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी अप्पर आयुक्त अविनाश कातडे, अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, कार्यकारी अभियंता कल्पना इखार, सहाय्यक अभियंता नेपाल भाजीपाले व वास्तूविशारद नीशिकांत भिवगडे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र टोकेकर उपस्थित होते.
नागपूर मध्यभारतातील हेल्थकेअर हबकडे वाटचाल करीत आहे, तथापि, येथे ऑर्गन ट्रान्सप्लाँटसाठी सुविधा नसल्याने रुग्णांना हैदराबाद, मुंबई व चेन्नईकडे जावे लागते. यात मोठा खर्च होत असल्याने हा उपचार अत्याधिक खार्चिक होता. त्यामुळे नागपूर येथे ऑर्गन ट्रान्सप्लाँट सुविधा निर्माण व्हावी अशी मागणी केली जात होती. नागपूर नजीकच्या कोराडी येथे ऑर्गन ट्रान्सप्लाँट सुविधा निर्माण करण्याची कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनातून स्वीकारली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हॉस्पिटलच्या परवानगीसाठी विशेष प्रयत्न केले. कोराडी संस्थानचे भक्तनिवास यासाठी देण्यात यावे अशी मागणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडे केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला व आता भक्तनिवासाचे रुपांतर श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्ज अॅण्ड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लाँट हॉस्पिटलमध्ये होणार आहे.
या हॉस्पिटलचा खर्चासाठी विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उभारला जाणार आहे. यामुळे माफक दरात नागपूरसह मध्य भारतातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील. सोबतच देशातील नामांकित शल्यचिकित्सकांचे मार्गदर्शन व सेवा वेळोवेळी मिळणार आहे. या हॉस्पिटलकरिता नागपूर येथील तज्ज्ञ शल्यचिकित्सक व संस्थानच्या निवडक संचालकांचे विश्वस्त मंडळ तयार करण्यात येणार आहे. विश्वस्त मंडळाद्वारे महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्ज अॅण्ड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लाँट हॉस्पिटल संचालित केले जाणार आहे. कोरोना दरम्यान फुफ्फुस व किडनी निकामी झाल्याने अनेकांचा असमयी मृत्यू झाला होता त्यामुळे अशा प्रकारच्या हॉस्पिटली मागणी केली जात होती, ती यामुळे पूर्ण होणार आहे.