Home मराठी भारत जोडो यात्रा | नागपूरच्या बाबा शेळकेंची राहुल गांधींसोबत आतापर्यंत 1200 किमीची...

भारत जोडो यात्रा | नागपूरच्या बाबा शेळकेंची राहुल गांधींसोबत आतापर्यंत 1200 किमीची पदयात्रा

483

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ पदयात्रा सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. यात्रेला मिळणारा वाढता प्रतिसादह अनेकांच्या औत्सुक्याचा विषय आहे. या पदयात्रेत नागपूरचे 71 वर्षीय काँग्रेस निष्ठावंत बाबा शेळके हे पहिल्या दिवसापासून सहभागी झाले असून आतापर्यंत त्यांनी1200 किमी. पदयात्रा पूर्ण केलीआहे. ते दिवाळीलाही घरी पोहचू शकले नाहीत. ‘मुलांना आणि आप्तस्वकीयांनी ‘बाबा आम्हाला तुमचा अभिमान वाटतो’ अशी प्रतिक्रिया दिली असून ती समाज माध्यमावर सध्या व्हायरल होत आहे.

बाबा शेळके हे जुने काँग्रेस कार्यकर्ते आहेत. एक वेळा ते नगरसेवकही होते. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी ‘घंटानाद’ ही संघटना स्थापन केली. यामाध्यमातून ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यांचा मुलगा बंटी हा सुद्धा लढाऊ काँग्रेस कार्यकर्ता आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय पदाधिकारी आहेत. सुरूवातीपासूनच गांधी विचारावर निष्ठा असणारे बाबा शेळके यांना राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढणार असे कळल्यावर त्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

७१ वर्ष वय असून आणि पदयात्रेत थकवा येण्याची भीती असूनही त्याची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष आणि समाजात पसरवण्यात येत असलेले जात-धर्मवादाचे विष याविरुद्ध लढा देण्यासाठी बाबा शेळके कन्याकुमारीला गेले. यात्रेच्या पहिल्या दिवसापासून ते राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालत आहेत. आतापर्यंत 1200 किलोमीटरची पदयात्रा त्यांनी पूर्ण केली. सध्या ते तेलंगणा राज्यात आहेत. दिवाळीत ते कुटुंबापासून लांबच होते.

काश्मीरपर्यंत जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भारत जोडो यात्रेला खूप प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांच्या मागे लोक स्वयंस्फुर्तीने येत आहेत. त्यांचे सहजतेने मिसळणे, वागणे आणि बोलणे लोकांना भावत आहे. सानथोर सारेच यात्रेत सहभागी होत आहेत. लोक त्यांचे जागोजागी स्वागत करीत आहे, असे शेळके यांनी मुलांना सांगितले.