स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी नेत्यांनी देशाची एकात्मता, समता, बंधुभाव, अबाधित राखण्यासह संविधान आणि सर्वांगीण स्वातंत्र्याची परिकल्पना केली होती. त्या मूळ संकल्पनेला छेद देत लोकशाही न मानणाऱ्या रा. स्व. संघ प्रणित भाजप सरकारने हरताळ फासला. त्यामुळे देशाला प्रचंड धोका निर्माण झाला आहे. लोकांच्या मनात अनामिक भीती आहे.
नागरिकांच्या मनातील ही भीतीची भावना काढून टाकत देशाच्या संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडतो यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे,ते लक्षात घेता राहुल गांधी केवळ काँग्रेसच्याच नव्हे तर संपूर्ण देशभरातील लोकांच्या मनात संविधान आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रती नवा विश्वास निर्माण करतील. असे प्रतिपादन काॅँग्रेसचे महासचिव खा. मुकुल वासनिक यांनी केले.
भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यापासून प्रवास करणार आहे. ही यात्रा १२ ते २० नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातून जाणार असून नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रथम आगमन होणार आहे. १७ ला ही यात्रा विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथून शेगाव, जळगाव जामोदला जाणार आहे.दरम्यान, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बाळापूर येथील यात्रेत सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या नियोजनासाठी कांग्रेसचे केंद्रीय महासचिव मुकूल वासनिक यांनी सोमवारी दोन्ही जिल्ह्यांतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेशी संवाद साधला. यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते बाळापूर येथे जाण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीने नियोजन केले असून एक हजार कार्यकर्त्यांची नोंदणी सुद्धा झालेली असल्याचे स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना श्री वासनिक म्हणाले की देशातील भेदरलेल्या नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या यात्रेत केवळ काँग्रेसी नव्हे तर देशातील कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर बोलण्याचे त्यांनी टाळले. ते म्हणाले की सरकारच्या वैधतेचा फैसला सर्वोच्च न्यायालय करणार आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे शिवसेनेसोबत महाविकास आघाडीत सहभागी होणे हा अत्यंत योग्य निर्णय होता असेही ते म्हणाले.
यावेळी नाना गावंडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, कांग्रेसचे राज्य महासचिव डॉ उसेंडी, जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, यात्रेचे गडचिरोली जिल्हा संयोजक आमदार सुभाष धोटे,नंदू नागरकर, डा. एन.डी. किरसान, रवींद्र दरेकर यांचेसह कांग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.