काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचे सोमवारी (७ नोव्हेंबर) रात्री ७.३० वाजता नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन होणार आहे. यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. “भारत जोडो’ पदयात्रेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शहरासह जिल्ह्यात आठ डिजिटल व्हॅन फिरत आहेत. भारत जोडो यात्रेतील सहभागी मान्यवरांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यात बाजरीची भाकरी, पिठले, दही-धपाटे, थालीपीठ, आंबट वरण, शेवभाजी, वांग्याचे भरीत हा मेन्यू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
भारत जोडो यात्रेसाठी राज्यभरातून नागरिक सहभागी होणार असल्याने काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान भारत जोडो यात्रा जिल्ह्यात असणार असून चार मुक्काम जिल्ह्यात असणार आहेत. ३ कॅम्प करण्यात आले आहेत. एक नंबरच्या कॅम्पमध्ये राहुल गांधी व काँग्रेसचे नेते असतील. दोन नंबरच्या कॅम्पमध्ये प्रमुख पाहुणे, नेते, राज्यातील काँग्रेसचे नेते, महिला काँग्रेस, सेवादल असे जवळपास हजार लोकांचा यात सहभाग असेल, तर ३ नंबरच्या कॅम्पमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी यांचा यात समावेश असणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, भारत जोडो यात्रेच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील वाडी, वस्ती, तांड्यावर आठ एलईडी डिजिटल व्हॅन फिरत आहेत. या माध्यमातून पदयात्रेचे इतर ठिकाणचे व्हिडिओ, नेत्यांच्या प्रतिक्रिया, फोटो, लघुपट दाखवण्यात येत आहेत. दररोज ५० किलोमीटरचे अंतर ही व्हॅन पूर्ण करते. नांदेड जिल्ह्यातीलही यात्रेचे चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे. व्हॅनवरील सहा बाय नऊ इंच टीव्ही सर्वांचे लक्ष वेधून घेत असून याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मेनांडर मीडिया सर्व्हिसेसचे संचालक जयपाल वाघमारे यांनी दैनिक ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी बाहेर जिल्ह्यातून ६० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांची झेड प्लस सुरक्षा व्यवस्था समोर ठेवून सुरक्षेचे नियोजन सूक्ष्म पद्धतीने केले आहे. तीन हजार अंमलदार व २५० पोलिस अधिकाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासमवेत ३०० जणांचा ताफा असणार आहे. तसेच ठिकठिकाणी हजारो अतिथी यात्री सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत ६० कंटेनर असणार असून त्याची लांबी ६० फूट इतकी आहे. या कंटेनरमध्ये बेड, स्वच्छतागृह खोलीप्रमाणे सर्व व्यवस्था असते. एका कंटेनरमध्ये १२ जण विश्रांती घेऊ शकतात, अशी व्यवस्था आहे.