नांदेडमधील देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील गुरुद्वारापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला सुरुवात झाली आहे. बिलोली तालुक्यातील शंकरनगरकडे पदयात्रा रवाना झाली आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राहुल गांधी नांदेडमध्ये पदयात्रा करणार आहेत. राज्यातील नांदेड, हिंगोली ,वाशीम, अकोला आणि बुलढाणा अशा 5 जिल्ह्यांतून 14 दिवस हि यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
राहुल गांधी यांनी देगलूर वन्नाळी येथील बाबा जोरावर सिंग बाबा फतेह सिंगजी यांच्या गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी गुरुपूरनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांध म्हणाले, गुरुनानक देवजी यांच्या आशीर्वादाने परस्पर सौहार्द आणि समानता निर्माण करणे हेच आमच्या यात्रेचे लक्ष्य आहे.
आजच्या पदयात्रेत काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, कन्हैया कुमारसह सर्व प्रमुख काँग्रेस नेते सहभागी झाले आहेत.
यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून ढोल-ताशांच्या गजरात हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले आहेत. आज देगलूरहून ही यात्रा निघाल्यानंतर देगलूर ते नांदेड हा मार्ग 7 ते 12 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. नांदेड मधील जवळपास 9 मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे. यात्रा सुरळीत व्हावी यासाठी 300 अधिकारी, दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीतील नेतेही सहभागी होणार, असी चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत सांगितले की, सध्या आजारी असलेले शरद पवार या यात्रेत सहभागी होतील. मात्र, तब्येत बरी नसल्याने ते काही वेळच राहुल गांधींसोबत चालणार आहेत. दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार की नाही, यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे.
राहुल गांधी यांची आजची यात्रा
- सकाळी 8.30 वाजता- नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात
- सकाळी 9.30 वाजता- अटकाळी गावाजवळ विश्रांती
- दुपारी 4 वाजता- पदयात्रेला खतगाव फाट्यापासून सुरुवात
- संध्याकाळी 7 वाजता- विश्रांती