स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपुरात एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी सुरू असून सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकॉप्टर उपराजधानीत दाखल झाले आहेत. नागपुरात शनिवारी रंगणार चित्तथरारक हवाई कसरती केल्या जाणार असल्या तरी बुधवार, १६ नोव्हेंबर पासून सूर्यकिरण एरोबॅटिक संघाने आपला सराव सुरु केला आहे. गुरुवार, १७ आणि शुक्रवार, १८ नोव्हेंबर ला सुद्धा नागपूरच्या आकाशात हा सराव होणार आहे.
कोव्हिडमुळे दोन वर्षांच्या अंतराने यंदा एअर शो होत आहे. वायुसेनानगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर शनिवारी, १९ नोव्हेंबर रोजी निमंत्रितांना हवाई थरार अनुभवता येणार आहे. वायुदलाच्या अनुरक्षण कमानचे मुख्यालय नागपुरात आहे. शिवाय, सोनेगाव येथे एअरफोर्स स्टेशन असल्याने वायुदलासाठी हे शहर महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन मध्य भारतातील युवकांना वायुदलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ठराविक कालावधीनंतर एअर शो घेण्यात येतो.
मागील काही वर्षांचा विचार करता २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये अशाप्रकारचा शो झाला होता. त्यानंतर यावर्षी हा शो होतोय. यामध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर, अॅवरो, आकाशगंगा, एअर वॉरिअर्स ड्रिल टीम, एनसीसी ग्लायडर्स आदींचा समावेश राहील. याप्रसंगी लढाऊ आणि मालवाहतूक करणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिके होतील. तसेच एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण विशेष आकर्षण राहणार आहे. मागील वेळी झालेल्या एअर शोमध्ये सुखोईचा समावेश होता. यंदाच्या शोमध्ये सुखोईचा समावेश नाही. त्यामुळे भारतीय वायुसेनेचा कणा असलेल्या अत्याधुनिक अशा या लढाऊ विमानाच्या हवाई कसरतींना नागपूरकर मुकणार आहेत.
“आकाशगंगा’ या पथकाचे १० याेद्धे ८ हजार फूट उंचावर या चित्तथरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या हवाई कसरती आणि प्रात्यक्षिके सादर करतील. यामध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश राहणार आहे. तसेच इतर उपक्रमांमध्ये पॅरा हँड ग्लाइडिंग, वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट, आयएएफ उपकरणांचे प्रदर्शन, एरो-मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँड सादरीकरण बघावयास मिळणार आहे. अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी दिली.