Home मराठी नागपूर येथे शनिवारी होणार ‘न्यूज पोर्टल आणि त्याविषयीचे कायदे’ कार्यशाळा

नागपूर येथे शनिवारी होणार ‘न्यूज पोर्टल आणि त्याविषयीचे कायदे’ कार्यशाळा

405

नागपूर ब्यूरो : डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने दिनांक : शनिवार, 7 जानेवारी 2023 रोजी नागपुरात प्रथमच डिजिटल मीडियासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत चालणारी ही कार्यशाळा वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. शैलेश पांडे (संपादक, तरूण भारत डिजिटल) यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ॲड. फिरदोस मिर्झा राहतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. ई. झेड. खोब्रागडे (निवृत्त सनदी अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा), श्री. प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर, श्री. विनायक देशपांडे, (कुलगुरू, जी.एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती), श्री. डॉ. विकास पाठक, (माजी प्राध्यापक, एशियन स्कूल ऑफ जर्नलिझम), ॲड. आनंद देशपांडे, (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ), डॉ. कल्याण कुमार यांची उपस्थिती राहील.

या कार्यशाळेमध्ये डिजिटल मीडिया आणि न्यूज पोर्टल संदर्भातील केंद्राने केलेल्या कायद्यासंदर्भात सविस्तर माहिती, न्यूज पोर्टल नोंदणीची प्रक्रिया, डिजिटल मीडियातील नव्या संधी आणि फेक न्युज रोखण्यासाठी उपाय, माध्यमे आणि प्रमाण भाषा यावर माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी कायद्यातील विविध तज्ञ, डिजिटल मीडियातील तज्ञ आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. समारोपीय सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी श्री. अनिल गडेकर यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यशाळेत राज्यभरातील ४० डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी सहभागी होत आहे.