नागपूर ब्युरो : नागपूरकरांच्या मेट्रो प्रवास अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने महामेट्रोच्या वतीने राजपत्रित सुटीच्या दिवशी प्रवाशांना मेट्रो रेल्वेच्या भाड्यात ३० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजपत्रित अवकाश असल्याने त्या दिवशी मेट्रोच्या तिकीट दरात ३० % सवलत मिळणार आहे. तसेच त्या पाठोपाठ १५ आणि १६ एप्रिलला शनिवार आणि रविवार असल्याने विकेंड डिसकाउंट चा लाभ देखील प्रवाशांना घेता येईल. अश्या प्रकारे मेट्रो प्रवाश्यांना सतत ३ दिवा ३० % सूट मिळणार आहे.
कामाच्या दिवसात कुटुंबासह बाहेर जाणे शक्य नसते. अश्या वेळी सुटीच्या दिवशी नागपूरकर या सवलतीचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात मेट्रोने प्रवास करू शकतात. अशा प्रवाश्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महा मेट्रोकडून राजपत्रित सुट्टीच्या दिवशी भाड्यात सवलत दिली जात आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत शहराच्या चारही दिशांना मेट्रो गाड्या धावत आहेत. शाळा/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रोमध्ये प्रवास करताना सोबत सायकल नेण्याची परवानगी तर आहेच, पण या शिवाय पदवी अभ्यासक्रमा पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता भाड्यात थेट 30 टक्के सवलत देखील आहे. मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोने महाकार्ड ची सोय केली आहे. कोणत्याही स्थानकातून आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रांच्या माध्यमातून प्रवाशांना तात्काळ महाकार्ड मिळू शकते. महाकार्डने प्रवास करण्यासाठी प्रवासी भाड्यात 10 टक्के सवलत दिली जात आहे. महामेट्रोने मेट्रोच्या भाड्यात दिल्या जाणाऱ्या ३० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.