Home Business महाहॅण्डलूम परिसरात 7 ऑगस्ट रोजी साजरा होणार राष्ट्रीय हातमाग दिवस

महाहॅण्डलूम परिसरात 7 ऑगस्ट रोजी साजरा होणार राष्ट्रीय हातमाग दिवस

नागपूर ब्युरो: भारतात सन 2015 पासून 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा करतात. या स्वदेशी हातमाग कलेला जीवंत ठेवण्यास प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र हातमाग महामंडळाद्वारे 7 ऑगस्त हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून महाहॅण्डलूम परिसरात दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता साजरा करण्यात येत आहे. या प्रसंगी हातमाग टस्सर कापडांवर गोंड पेंटींग केलेल्या कलेची प्रसिद्धी सन्मानार्थ भारत सरकार डाक विभागाचे संयुक्त विद्यमाने लिफाफ्याचे विमोचन, हातमाग वस्त्रांचा फॅशन शो, हातमाग विणकरांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती देवून उत्कृष्ठ विणकाम करणाऱ्या विणकरांचा सत्कार, हातमाग महामंडळाच्या विपणनाकरीता मदत करणाऱ्या व फॅशन शो मध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. ही माहिती महाहॅण्डलूमच्या व्यवस्थापकीय संचालिका सिमा पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत महाहॅण्डलूमचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय निमजे, फॅशन डिझायनर निधी गांधी व अधिकारी वर्ग प्रामुख्याणे उपस्थित होते.


राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त दिनांक 5 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन व ॲपद्वारे खरेदी करतांना अतिरिक्त 5% सुट व विक्री केंद्रामार्फत हातमाग कापडाची खरेदी करतांना 10% अतिरिक्त सुट देण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी हातमाग वस्त्रांची खरेदी करुन हातमाग क्षेत्राला बळकट करण्यास मदत करावी जेणे करुन त्यांच्या परंपरागत कलेची प्रचार प्रसिद्धी होवून रोजगारीत भर पडण्यास मदत होईल.
राज्यात वस्त्रोद्योग व्यवसाय राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून सदरचा व्यवसाय संपूर्ण राज्यात पसरलेला आहे. ह्यात हातमाग व्यवसायाचा मोठा वाटा आहे. हातमाग व्यवसाय टिकवून, परंपरागत कलेचे जोपासना करण्यास महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ सतत प्रयत्नशील आहे. भारतात राष्ट्रीय हातमाग दिवस दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी आयोजित केला जातो. भारताच्या परंपरागत व्यवसायाचे जतन करणे आणि हातमाग उद्योगाशी संबंधित लोकांना अधिक संधी उपलब्ध करुण देणे हे देखील यामागचे उद्दिष्ट आहे.

यावेळी त्यांनी सांगीतले कि भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या दिर्घकालीन हातमाग व्यवहार्यतेचे रक्षण करणे, त्याद्वारे हातमाग कारागिरांना आर्थिकदृष्या बळकट करणे आणि त्यांच्या उत्कृष्ट कलात्मकतेचा अभिमान वाढवणे हे देखील ध्येय आहे. हातमाग विषयी जनजागृती करण्यासाठी आणि देशाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी 1 त्याचे महत्व जाणून घेण्यासाठी भारतात राष्ट्रीय हातमाग दिवस पाळला जातो.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून घोषित केला.
स्वदेशी चळवळीचे स्मरण म्हणून 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे राष्ट्रीय हातमाग दिन आणि स्वदेशी चळवळ यांचा घट्ट संबंध आहे. राष्ट्रीय हातमाग दिनाचे उद्दिष्ट केवळ हातमाग विणकर समुदायाला सन्मानित करणे हेच नाही तर या क्षेत्रातील सध्याच्या आव्हानांना तोंड देणे देखील आहे.